Suresh Dhas-Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Aashti Assembly Constituency: भाजपचेच उमेदवार म्हणतात, लोकांची भावना मोठ्या पवारांकडे, छोट्या पवारांकडे नकारात्मक

Suresh Dhas Comments on Sharad Pawar: महायुतीने आष्टीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब आजबे आमदार असताना भाजपला जागा सोडून सुरेश धसांना उमेदवारी दिली आणि नंतर पुन्हा बाळासाहेब आजबे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने मैत्रीपुर्ण लढतीचा तोडगा काढला असला तरी आता या दोन पक्षांत धुमश्चक्री सुरु आहे.

Datta Deshmukh

Maharashtra Assembly Election 2024 : `पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत, दाल मे कुछ तो काला है`, अशी तोफ भाजपचे उमदेवार सुरेश धस यांनी डागली आहे. आष्टी मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून मला घोषीत केले आणि ऐनवेळी घड्याळाचा एबी फॉर्म येतो, आणि तेही एव्हढ्या जोरात सांगतात की एबी फॉर्म आला, जसं काय डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षाचा फॉर्म आलाय.

लोकांची भावना मोठ्या पवाराकडे आहे. छोट्या पवाराकडे नकारात्मक आहे. मग आतून नेमकं चाललंय काय? दाल मे कुछ तो काला है, अशी तोफ डागत हे कोणी केलं? घड्याळ चिन्ह दिले गेले, कमळाला रोखण्यासाठी का? असा आरोपही सुरेश धस यांनी प्रचार सभेत केला.

महायुतीने आष्टीत मैत्रीपुर्ण लढतीचा पर्याय दिला असला तरी आता पक्षांची लक्तरे वेशीला टांगण्याचे प्रकार सुरु झाल्याने याचे पडसाद राज्यभर उमटणार आहेत. मागच्या वर्षी महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सहभाग झाला आणि एकाच म्यानात देान तलवारी असे चित्र झाले. त्यात ज्याचा आमदार ज्याचा उमेदवार असे महायुतीचे विधानसभा निवडणुकीचे समिकरण ठरले असले तरी ताकदवान नेते गप्प तरी कसे राहणार हेही तेवढेच खरे.

त्यातच महायुतीने आष्टीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब आजबे आमदार असताना भाजपला जागा सोडून सुरेश धसांना उमेदवारी दिली आणि नंतर पुन्हा बाळासाहेब आजबे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसने मैत्रीपुर्ण लढतीचा तोडगा काढला असला तरी आता या दोन पक्षांत धुमश्चक्री पेटली आहे. अगोदरच तुमच्या घड्याळाचे बारा वाजले असा टोला भाजप उमेदवार सुरेश धस यांनी लगावला आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन झाल्यापासून मागचे 25 वर्षे जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहीले. महायुतीतील शिवसेना व आघाडीतील कॉंग्रेस कायमच दुय्यम असल्याने निवडणुकांतील लढत कायमच भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस अशीच असायची. दोन्ही पक्ष एकत्र आल्याने महायुतीत मातब्बरांची संख्या वाढली. त्यामुळे उमेदवारींसाठी रस्सीखेच आणि मग नाराजीतून पुन्हा एकमेकांचे पुन्हा राजकीय विरोधक असे समिकरण झाले.

दरम्यान, महायुतीत आष्टी मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत. याच मतदार संघात महायुतीतील भाजपचे सुरेश धस व भिमराव धोंडे हे दोन्ही माजी आमदारही तयारी करत होते. ज्यांचा आमदार त्यांचा विधानसभेला उमेदवार असे महायुतीच्या समिकरण ठरलेले असताना बीड व गेवराईच्या जागांची आदलाबदल करण्यात आली. निवडणुकीपुर्वीच याची कानकुन गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांना लागलेली असल्याने त्यांनी स्वत: भाजपचा त्याग केला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यामुळे आष्टीची जागा भाजपला जाऊन सुरेश धस यांना उमेदवारी भेटली. त्यामुळे मग आजबे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पण मग लागलीच राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांना उमेदवारी जाहीर केली. महायुतीने येथे मैत्रीपुर्ण लढतीचा तोडगा काढल्यानंतरही भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे रिंगणात आहेतच. महायुतीत त्रांगडे झालेले असतानाच आता भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस ऐकमेकांवर तुटून पडत आहेत. उमेदवारांचे व्यक्तीगत उणेदुणे आता पक्षांवरही सुरु झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT