BRS News Sarkarnama
मराठवाडा

BRS Maharashtra News : महाराष्ट्रातील नेत्यांचे गुलाबी स्वप्न भंगले; BRS नेही वाऱ्यावर सोडले...

Nanded News : कोणी लोकसभा तर कोणी विधानसभेची तयारी सुरू केली. पण या सगळ्या तयारीवर तेलंगणाच्या पराभवाने पाणी फेरले.

Laxmikant Mule

Marathwada Political News : तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव 'भारत राष्ट्र समिती' करून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राची निवड केली. (BRS Maharashtra News) नांदेडमधील सभेनंतर मराठवाड्यासह राज्यांतील विविध भागात सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. या गुलाबी स्वप्नांची भुरळ राज्यातील विविध पक्षातील माजी आमदार, पदाधिकाऱ्यांना पडली. पण आता त्यांचे गुलाबी स्वप्न भंगले आहे.

ज्या तेलंगणा पॅटर्नच्या जोरावर केसीआर महाराष्ट्रात (Maharashtra) पाय जमवू पाहत होते, तो पॅटर्न तेलंगणाच्या जनतेने नाकारला आणि बीआरएसला सत्तेवरून पायउतार केले. तिकडे सत्ता गेली आणि इकडे राज्यातील बीआरएसच्या नेत्यांची घालमेल सुरू झाली आहे. तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात नांदेड (Nanded) जिल्हा असल्याने‌ या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून दक्षिणात्य पक्ष असलेल्या एमआयएमने पक्षवाढीसाठी नांदेडची निवड केली होती.

याचा फायदा या पक्षाला झाला आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुस्लीम बहुल भागात त्यांना चांगले यश मिळाले. (K.Chandrashekhar Rao) गेल्या निवडणुकीत एक खासदार, आमदारही निवडून आला. हाच कित्ता गिरवत त्यांचा मित्रपक्ष असलेल्या बीआरएसने पहिली सभा नांदेड शहरात घेतली होती. या सभेचा गाजावाजा झाला, तेलंगणा राज्यातील विविध विकास योजनांची माहिती देण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी बीआरएसच्या आमदार, खासदार मंत्री यांनी खूप वेळ दिला. पण तिकडे आपल्या राज्यातील मतदारांचा मूड काय आहे, योजना जनतेपर्यंत पोहचविल्या जातात की नाही याचा थांगपत्ता या नेत्यांना लागला नाही. महाराष्ट्रात जितका वेळ घालवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला गेला तितकाच वेळ जर आपल्या राज्यात दिला असता तर सत्त गेली नसती, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

नांदेडच्या सभेनंतर मराठवाड्यासह राज्यांतील विविध भागात सभा झाल्या व माजी आमदार, पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीची वाट धरली होती. गेल्या वर्षांपासून या पक्षाने राज्यातील विविध पक्षातील नेत्यांना गळाला लावले होते. या पक्षात आलेल्या नेत्यांनी पक्ष प्रवेशाचे मेळावे घेतले, पक्षवाढीचे कामही सुरू केले. कोणी लोकसभा तर कोणी विधानसभेची तयारी सुरू केली. पण या सगळ्या तयारीवर तेलंगणाच्या पराभवाने पाणी फेरले गेले आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालानंतर महिना होत आला आहे. या काळात तेलंगणा मधील बीआरएसचा एकही नेता महाराष्ट्रात फिरकला नाही. तसेच राज्यातील प्रभारी, पदाधिकारी व कार्यकर्ते नेमके कुठे गेले ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात या पक्षाचे भवितव्य काय असेल ? पक्षांत आलेल्या नेत्यांचे काय होणार ? स्वपक्षात परत जावे की थोडी वाट पाहावी, अशी घालमेल सध्या प्रत्येकाची सुरू आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT