Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत बीआरएस, एमआयएमने पंकजा मुंडेची डोकेदुखी वाढवली..

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political : सातत्याने नाराजीच्या बातम्या आणि चर्चांमुळे प्रकाशझोतात असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बीआरएस आणि एमआयएम या पक्षाने चांगली कोंडी केली आहे. (Pankaja Munde News) बीआरएसने पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत पक्षात येण्यासाठी पायघड्या घातल्या. तर एमआयएमने आम्ही तर पंकजा यांना दोन वर्षापुर्वीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट करत बीआरएसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. परळी विधानसभेतील पराभवानंतर भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचे महत्व कमी झाले. विधान परिषद, राज्यसभेवर संधी उपलब्ध असतांना त्यांना डावलण्यात आले. त्यांच्याऐवजी त्यांना नेते मानणाऱ्या इतरांना संधी, मंत्रीपदे बहाल करण्यात आली. त्यामुळे पंकजा मुंडे या कायम नाराज असल्याच्या चर्चा चार वर्षांपासून सुरू आहे. जाहीर भाषणातून पंकजा यांनी आपली नाराजी बोलून देखील दाखवली होती. तरी देखील (Bjp) भाजपचे दिल्ली आणि राज्यातील नेते मात्र त्या नाराज नसल्याचे सांगत राहिले.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती, पुण्यतिथी आणि दसरा मेळाव्याच्या गोपीनाथ गडावरील त्यांच्या भाषणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. याची दखल सगळ्याच राजकीय पक्षांनी घेवून त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या. शिंदे-ठाकरे गटाकडून तर त्यांना ऑफर देण्यात आल्याच, पण त्या स्पर्धेत आता एमआयएम (Aimim) आणि तेंलगणातील भारत राष्ट्र समिती या दोन नव्या पक्षांची देखील भर पडली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना दोन वर्षापुर्वीच सोबत या तुम्हाला मुख्यमंत्रीपद देवू, अशी ऑफर दिली होती, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. तर तिकडे बीआरएसने देखील पंकजा यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे समोर आले आहे. अर्थात पंकजा मुंडे यांनी दोन वर्षापुर्वी एमआयएमने दिलेल्या ऑफरवर देखील भाष्य केले नव्हते आणि आता बीआरएसच्या प्रस्तावावर देखील गप्प राहणे पसंत केले आहे.

पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी जाहीर करत एक दबावगट तयार करण्याचा प्रयत्न केला. पण भाजप श्रेष्ठींनी त्याकडे दुर्लक्ष केले. तरीही भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वावर विश्वास ठेवून पंकजा यांनी कुठलेही टोकाचे पाऊल उचललेले नाही. पण त्यांच्या मनातील खदखद कायम आहे, नेमका याचाच काही फायदा होतो का? याची चाचपणी बीआरएस, एमआयएम सारखे पक्ष करत आहेत. अर्थात या दोन्ही पक्षांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जाते.

मग पंकजा मुंडे यांना या पक्षांकडून ऑफर द्यायला लावून, त्यांच्या अडचणीत अधिक भर घालण्याचा तर हा पक्षांतर्गत पंकजा विरोधकांचा डाव नाही ना? अशी शंका देखील उपस्थितीत केली जात आहे. पंकजा मुंडे यांनी नुकत्याच झालेल्या गोपीनाथ गडावरील भाषणात आपण अमित शहा यांची भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत.

तुम्ही माझे काय करायचे ठरवले आहे? हे विचारणार आहोत, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्या तरी अजूनही वेट अॅन्ड वाॅचच्याच भूमिकेत आहेत. अशावेळी त्यांना इतर पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर या त्यांच्यासाठी संधी नाही, तर भाजप नेतृत्वाच्या मनात गैरसमज पसरवणाऱ्या ठरू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT