BRS Marathwada News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada BRS News : लोकसभेत गायब झालेला बीआरएस पक्ष विधानसभेत दिसणार...

Political News : गुलाबी वादळ ज्या वेगाने आले, त्यापेक्षा दुप्पट वेगाने शमले. स्वतःच्याच राज्यात सत्ता गमावल्यामुळे चंद्रशेखर राव व त्यांचा पक्ष खचला. एवढा की ते त्यातून बाहेरच पडू शकले नाही.

Jagdish Pansare

Chhatrpati Sambhaji Nagar News : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाने लोकसभा निवडणुकीआधी मराठवाडा आणि महाराष्ट्रात हवा निर्माण केली होती. पक्षाचा देशभर विस्तार करण्याचा संकल्प घेत मराठवाड्यातील नांदेड मार्गे चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात दणक्यात एन्ट्री केली.

'अब की बार किसान सरकार' ही घोषणा आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी तेलंगणात राबवलेल्या योजनांनी अनेक राजकीय पक्षातील पदाधिकारी, आजी-माजी नेत्यांना भूरळ घातली.

विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी मोठ्या प्रमाणात बीआरएसचा (BRS) पर्याय स्वीकारला. मराठवाड्यात सर्वत्र पक्षप्रवेश सोहळे, मेळावे आणि त्या निमित्ताने चंद्रशेखर राव यांची खास दक्षिणेतील फिल्मस्टाईल एन्ट्री सगळ्यांना भावली. पण हे घोंगावत आलेले गुलाबी वादळ ज्या वेगाने आले, त्यापेक्षा दुप्पट वेगाने शमले. स्वतःच्याच राज्यात सत्ता गमावल्यामुळे चंद्रशेखर राव व त्यांचा पक्ष खचला. एवढा की ते त्यातून बाहेरच पडू शकले नाही.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत हा पक्ष कुठेच दिसला नाही. पण महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी बीआरएसने सुरू केल्याचे महाराष्ट्रातील त्यांचे नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे (Shankar Dhondge) यांनी सांगितले. शेतकरी आणि कामगार चळवळीत काम करणाऱ्या नेते आणि संघटनेसोबत तिसरी आघाडी स्थापन करण्याची तयारी बीआरएसने सुरु केली आहे.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty), शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडे, स्वतंत्र भारत पक्षाचे नेते अनिल धनवट, माजी आमदार वामनराव चटप, बुलढाणा येथील रविकांत तुपकर यांच्याशी या तिसऱ्या आघाडी संदर्भात चर्चा सुरु असल्याचे बीआरएसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी सांगितले. या संदर्भात चर्चा करण्यासाठी येत्या 18 जुलै रोजी पुण्यात पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे.

बीआरएस पक्ष तिसरी आघाडी तयार करून महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर लढणार असल्याचे धोंडगे यांनी सांगितले आहे. राज्यातील आधीच्या महाविकास आघाडी आणि आताच्या महायुती सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. त्यांना सक्षम पर्याय आम्ही तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चितच आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळेल, असा दावाही धोंडगे यांनी केला आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT