K. Chandrasekhar Rao Rally News
K. Chandrasekhar Rao Rally News Sarkarnama
मराठवाडा

BRS Rally News : बीआरएसने दाखवलेले स्वप्न सत्यात उतरेल का ?

Jagdish Pansare

Marathwada : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची काल छत्रपतीसंभाजी नगरात सभा झाली. शांत संयमी स्वभावाच्या राव यांनी तेलंगणा मॉडेलचा प्रचार करतानाच केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर टीकाही केली. अबकी बार किसान सरकार,असा नारा देत त्यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचा विस्तार महाराष्ट्र मार्गे सुरू केला आहे. नांदेड मधून राज्यात एन्ट्री केल्यानंतर त्यांनी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरवर लक्ष केंद्रित केले.

येथून घडलेल्या घडामोडींचे पडसाद संपूर्ण राज्यात आणि देशात उमटतात असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तेलंगणामध्ये जे करून दाखवले ते (Maharashtra) महाराष्ट्राची सत्ता हाती दिल्यास पाच वर्षात करून दाखवतो,असा विश्वास देखील त्यांनी सभेला जमलेल्या गर्दीला दिला. (Chandrashekhar Rao) तेलंगणा राज्याची भौगोलिक परिस्थिती, कार्यक्षेत्र पाहता केसीआर यांनी गेल्या आठ वर्षात केलेला विकास नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.

मात्र तेच मॉडेल घेऊन ते महाराष्ट्र आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये जाऊ पाहत आहेत. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नाही, त्या त्या राज्यातील प्रस्थापित पक्षांशी त्यांना झगडावे लागणार आहे. (Marathwada) महाराष्ट्रात याची प्रचिती त्यांना यायला लागली आहे. काल केलेल्या भाषणात त्यांनी फडणवीसांचा आपल्याला फोन आला होता, तुम्ही तेलंगणा सांभाळा महाराष्ट्रात कशासाठी येता असे ते आपल्याला म्हणाल्याचे केसीआर यांनी सांगितले. (Narendra Modi) याचाच अर्थ तेलंगणातील पक्षाची महाराष्ट्रात लुडबुड नको असेच येथील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना देखील वाटत आहे.

केसीआर यांनी शेतकरी केंद्रबिंदू मानत महाराष्ट्रात वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या पक्षात मराठवाड्यातील ज्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला त्यात बहुतांश हे शेतकरी व त्या संघटनांशी जोडले गेलेले आहेत. शहरी भागात आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही याची जाणीव केसीआर यांना आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या भाषणातून जिल्हा परिषद निवडणुकीत बीआरएसचा गुलाबी झेंडा फडकवा, मग पहा मोठे नेते आणि दिल्लीतील नेते देखील तुमच्या मागे धावत येतील असे सूचक विधान केले होते.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी दरवर्षी प्रति एकर दहा हजार रुपये, मोफत 24 तास वीज, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आठ दिवसात पाच लाखांची मदत, प्रति एकर शेतकऱ्याला पाणी, दलित बंधू योजना याची माहिती देताना हे महाराष्ट्रात देखील शक्य असल्याचे केसीआर यांनी सांगितले. ऐकायला आणि पाहायला हे चांगले वाटत असले तरी तेलंगणात सत्यात उतरलेले हे स्वप्न महाराष्ट्रात खरे ठरेल का? हा मोठा प्रश्न आहे. केसीआर यांच्या भावना शुद्ध असल्या तरी मतदारांचा त्यांना कसा आणि किती प्रतिसाद मिळतो यावर सगळे अवलंबून आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात जितक्या शेतकरी संघटना उदयास आल्या त्यांनी स्वतःचा आपला दबाव गट निर्माण करत कायम सत्ताधाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले. त्यामुळे अशा संघटनांच्या कामातून शेतकऱ्यांचे हित कमी आणि संघटनांच्या नेत्यांचे चांगभलें अधिक झाले. शेतकऱ्यांचा देखील अशा संघटनांवर आता फारसा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे अबकी बार किसान सरकार,असा नारा देणाऱ्या बीआरएसला महाराष्ट्रात अनेक वर्ष मेहनत करावी लागणार आहे.

राज्यातील सगळ्या निवडणुका लढवण्याची तयारी या पक्षाने केली असली तरी तेलंगणातून मोजके पदाधिकारी आणून सभा घेण्यात येते ते सोपे नाही. स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत होऊन प्रामाणिकपणे जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात बीआरएसला फारसा वाव नाही. त्यामुळे केसीआर यांच्या कालच्या सभेने वातावरण निर्मिती केली, मराठवाड्यातून आणलेल्या कार्यकर्त्यांमुळे सभेला गर्दीही जमली. परंतु तेलंगणाचे हे मॉडेल राज्यासाठी मृगजळच ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT