Buldhana DCC Bank : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हा बँकेच्या पॅनलमध्ये राष्ट्रवादीला स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दिवंगत अजित पवार यांनी बँक वाचवण्यासाठी मोठा निधी दिला असतानाही त्यांच्या पक्षालाच डावलण्यात आल्यामुळ त्यांनी संतापही व्यक्त केला.
मंत्री पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याशी स्वतः चर्चा केली होती. जिल्ह्यात सर्वपक्षीय लोकांना एकत्र घेत असाल, तर आमच्या लोकांनाही कुठेतरी संधी देण्याचा प्रयत्न करा. आपल्या पक्षातील काही लोकांनाही पॅनेलमध्ये संधी द्यावी, अशी मागणी आपण त्यांच्याकडे केली होती.
"मात्र, बुलढाणा जिल्ह्यात तसे झाले नाही. त्यांनी आमचा एकही उमेदवार सर्वपक्षीय पॅनलमध्ये घेतलेला नाही. या गोष्टीची निश्चितच आम्हाला खंत आणि वाईट वाटत आहे,” असे मकरंद पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी अजित पवारांनी बुलढाणा जिल्हा बँकेसाठी केलेल्या सहकार्याचाही संदर्भ दिला.
"बुलढाणा जिल्हा बँक ही अतिशय अडचणीत असलेली बँक होती. बँक वाचवण्यासाठी स्वर्गीय अजित पवार यांनी जवळपास 300 ते 350 कोटी रुपयांचा निधी दिला. एवढे सहकार्य करूनही त्यांच्या पक्षातील लोकांनाच डावलण्यात आले. यापेक्षा दुसरी शोकांतिका असू शकत नाही,” असा संतापही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
बिनविरोधचा प्रयत्न फसला :
दरम्यान, राष्ट्रवादीच्या इच्छुकांना ‘सहकार’ पॅनेलमध्ये स्थान न मिळाल्याने या पॅनेलविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनेल मैदानात उतरवले आहे. सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांच्या पुढाकाराने ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल’ स्थापन करण्यात आले. या पॅनेलकडून ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
१२ जागा बिनविरोध, आता नऊ जागांवर सामना
बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १२ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगारमंत्री आकाश फुंडकर, शिवसेना आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह विविध पक्षांतील नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित नऊ जागांसाठीची निवडणूक आता अधिक लक्षवेधी ठरली आहे.
बिनविरोधचा प्रयत्न फसल्याने या निवडणुकीला राजकीय रंग चढला आहे. सध्या सहकार पॅनेल’कडून ८ उमेदवार, तर ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल’कडून ७ उमेदवार मैदानात आहेत. याशिवाय ७ उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे २३ उमेदवारांमध्ये ९ जागांसाठी सामना रंगणार आहे.
२३ ऑगस्टला मतदान, २४ ऑगस्टला निकाल
बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित नऊ जागांसाठी २३ ऑगस्ट २०२६ रोजी मतदान होणार असून २४ ऑगस्टला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय ‘सहकार’ पॅनेलसमोर अजित पवार गटाच्या स्वतंत्र पॅनेलचे आव्हान किती प्रभावी ठरते, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.