Certificate Allotment News Sarkarnama
मराठवाडा

Certificate Allotment News : काल निर्णय अन् पहिल्याच दिवशी सात कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप..

Jagdish Pansare

Marathwada News : न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल काल (ता.31) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला. (District Collector News) निजामकालीन नोंदी आढळल्या अशा मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र तत्काळ वाटप करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला होता. आज प्रत्यक्षात कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

मराठवाड्यातील (Marathwada) धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी जर्नादन विधाते, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तलाठी सुवर्णा पाटील यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले.

चौका (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील रिया कांताराव पवार, विराट विजय पवार, जय विजय पवार व सौरभ साईनाथ पवार यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. (Maratha Reservation) तर उपविभागीय अधिकारी पैठण व फुलंब्री यांच्या कार्यालयातही जात प्रमाणपत्र देण्यात आले. (Maharashtra) या प्रसंगी परीक्षा विक्षाधिन उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, पैठण फुलंब्री उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येथे रामेश्वर कचरू कोलते (रा. कवीटखेडा ता. फुलंब्री), अनिल सदाशिव कापरे (रा. महाल किंहोळा ता.फुलंब्री), गणेश हरिबा तुपे (रा. महाल किंहोळा ता.फुलंब्री) यांचे प्रमाणपत्र देण्यात आले. सन १९५१ चे खासरा पाहणी पत्रकमध्ये नमूद मराठा कुणबी जातीच्या नोंदी आधारे हे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल मंगळवाी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला. कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

याशिवाय मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले होते. न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या. संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू होणार आहे. मराठा आरक्षण व सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. तूर्तास सरकारने नोंदीच्या आधारे प्रमाणपत्रांचे वाटप सुरू केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT