Dharashiv Politics : Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics : धाराशिव लोकसभेतून सुरेश बिराजदारांना संधी ? अजित पवारांचा दावा

NCP Politics : लोकसभेच्या धाराशिव आणि परभणी या मतदारसंघांवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार ंगटाने दावा केला आहे.

अय्यूब कादरी

Dharashiv Politics : लोकसभेच्या धाराशिव आणि परभणी या मतदारसंघांवर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दावा केला आहे. धाराशिव मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला तर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, धाराशिव जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटणार, असे गृहीत धरून तयारीला लागण्याचे आदेश प्रा. बिराजदार यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनेक नेते इच्छुक आहेत. आता त्यात हा नवा ट्विस्ट आला असून, महायुतीच्या नेत्यांमध्ये अतर्गत कुरघोड्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रा. सुरेश बिराजदार हे अगदी सुरुवातीपासून पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांचे काका दिवंगत भाऊसाहेब बिराजदार हे १९८२ ते १९८५ पर्यंत उमरग्याचे आमदार होते. सुरेश बिराजदार यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषवले आहे. बलसूर (ता. उमरगा) या त्यांच्या गावापासून जवळच त्यांनी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आहे. ते जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. त्यांनी उभारलेल्या भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँकेचे कामकाजही व्यवस्थित सुरू आहे.

उमरग्यात या बँकेचे चकाचक अशा काॅर्पोरेट कार्यालयात स्थलांतर झाले आहे. या कार्यक्रमाला अजित पवार यांनी आवर्जून हजेरी लावली होती. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर प्रा. बिराजदारही त्यांच्यासोबत गेले. त्यांचा हा निर्णय आश्चर्यकारक होता. गेल्यावेळेही धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्यांचे नाव समोर आले होते, मात्र ऐनवेळी ते मागे पडले.

भाऊसाहेब बिराजदार कारखान्यामुळे उमरगा, लोहारा, औसा तालुक्यांना प्रा. बिराजदार हे चांगले परिचित आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही त्यांचा संपर्क आहे.

तुळजापूरला भाजपचे राणाजगजितसिंह पाटील, भूम-परंडा येथे शिवसेनेचे (शिंदे गट) डाॅ. तानाजी सावंत आणि उमरगा येथे शिवसेनेचे (शिंदे गट) ज्ञानराज चौगुले हे सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत. प्रा. बिराजदार यांच्यासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. याचा विचार करूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघाची मागणी केली असण्याची शक्यता आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे अनेक नेते इच्छुक आहेत. त्यात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, विद्यमान जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरूळ यांचा समावेश आहे. धाराशिवचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे शिंदे गट या मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता कमी मानली जात आहे. असे असले तरी जिल्ह्यातील चारपैकी दोन आमदार शिंदे गटाचे आहेत.

शिवसेनेचे माजी खासदार प्रा, रवींद्र गायकवाड सध्या शिंदे गटात आहेत. लोकसभेची निवडणूक लढवण्यास तेही इच्छुक आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने धाराशिव लोकसभा मतदारसंघाची मागणी केल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. हा पेच महायुतीला कोणत्या दिशेला नेईल, हे आगामी काही महिन्यांत स्पष्ट होईल.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT