Mumbai : शिवसेनेत २० जून २०२२ रोजी मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत सत्ताही स्थापन केली. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गटातला संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आहे.
दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट मागील वर्षी आमनेसामने आले होते. अखेर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दसरा मेळावे पार पडले होते. यावर्षीदेखील ठाकरे आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून रान पेटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही गट आक्रमक झाले असून, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे - शिंदे गटाकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
गेल्यावर्षी मैदानावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. आता यंदाच्या वर्षी मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाकडून बीएमसीकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटानं मुंबई महापालिकेला महिनाभरापूर्वी अर्ज केला असल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्या (Dasra Melava)साठी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून जागांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटाने सावध भूमिका घेत महापालिकेकडे अर्ज दाखल केला आहे. याचवेळी पालिका मैदानाची परवानगी देण्यासंदर्भात मात्र सावध भूमिका घेण्याच्या तयारीत आहे, पण तरीदेखील आम्हालाच मैदान मिळेल, असा विश्वास ठाकरे गटाला आहे. एकीकडे हे सगळं सुरू असतानाच शिंदे गटही दसरा मेळाव्यासाठी अॅक्शन मोडवर आला आहे.
ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना(Shivsena) शिंदे गटाकडून जागांचा शोध सुरू आहे. मागच्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंना शिवाजी पार्कवर परवानगी दिल्यानंतर शिंदे गटाने बीकेसीत दसरा मेळावा घेतला होता, पण यंदाच्या वर्षी बीकेसीत दसरा मेळाव्याला परवानगी मिळणे कठीण आहे. कारण मागच्या वर्षी शिंदेंच्या मेळाव्याला लक्षणीय गर्दी झाली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले आहे. यामुळे शिंदेंच्या मेळाव्याला आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच बीकेसीत आजूबाजूला विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे बीकेसीत मेळावा घेणं शक्य नसल्याची माहिती आहे. या सगळ्या घडामोडींमुळे शिंदे गटाक़ून महालक्ष्मी रेसकोर्सवर दसरा मेळावा घेण्यासाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दसरा मेळाव्याला आता आव्वाज कुणाचा?
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला वर्षानुवर्षांची परंपरा आहे. राज्यभरातील शिवसैनिक शिवाजी पार्कवर दसऱ्याला विचारांचं सोनं लुटायला येत असतात. मात्र, शिंदेंच्या बंडांनंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडतात. आता सलग दुसऱ्या वर्षी दोन्ही गटांनी दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील वर्षी अखेरच्या क्षणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी दिली.
त्यानंतर ठाकरे गट शिवाजी पार्क, तर शिंदे गट बीकेसीच्या मैदानावर सभा घेतली होती दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी जमवत शिंदे आणि ठाकरे गटाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आता लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच मुंबई, पुण्यासह राज्यातील रखडलेल्या प्रमुख महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. याच धर्तीवर ठाकरे आणि शिंदे गट आपली ताकद दाखवत शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.