Chandrakant Khaire News Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News: प्रचार संपताच खैरेंनी घेतले भद्रा मारोतीचे दर्शन..

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar: प्रचाराचा काल शेवटचा दिवस असल्याने सगळ्याच राजकीय पक्षाच्या उमेदवार, नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा चांगलाच घाम निघाला. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीतील शिवसेना-मनसे आणि महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शहरातील क्रांतीचौक भागात ऐकमेकांना भिडले होते.

दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी, दारुच्या बाटल्या, दोनशे, पाचशेच्या नोटा दाखवून डिवचण्याचे प्रकार घडले. यातून धक्काबुक्कीसारखा किरकोळ प्रकार घडला आणि पोलिसांचा ताण वाढला. पण ही परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसाला कुठलेही गालबोट लागू दिले नाही. परंतु या सगळ्या प्रकारामुळे उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची चांगलीच ओढाताण झाली.

दोन आठवडे जिल्हाभरात सुरू असलेला प्रचार, भेटीगाठी, कॉर्नर बैठका, नेत्यांच्या सभा, मेळावे, पदयात्रा त्या ही चाळीस अंश तापमानात केल्यामुळे अनेकांना थकवा आला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी एवढ्या घाईगडबडीत प्रचार संपल्यानंतर रात्री खुलताबाद येथे जाऊन भद्रा मारोतीचे दर्शन घेतले. धार्मिक वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या खैरे यांनी प्रचारानंतर भद्रा मारुतीचे दर्शन घेत उद्याच्या मतदानासाठी साकडे घातले.

निवडणूक प्रचारा दरम्यान, विरोधकांनी चंद्रकांत खैरे यांचा मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनेचे महत्व सांगणारा व्हिडिओ व्हायरल करत त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थितीत केले होते. पण तो केवळ निवडणुकीचा फंडा होता, आपण सच्चे हिंदुत्ववादी आणि धार्मिक वृत्तीचे देवाला मानणारे आहोत, हे खैरे यांनी कृतीतून दाखवून दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. चंद्रकांत खैरे संभाजीनगर मधून सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत.

याआधी चार निवडणूक त्यांनी जिंकल्या होत्या. गेल्यावेळी त्यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला होता. दरम्यान, राज्यात शिवसेनेत झालेले बंड, पक्षात झालेली फाटाफूट यानंतरही चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निष्ठेचे फळ सहाव्यांदा लोकसभेच्या उमेदवारीच्या रूपाने मिळाली.

आता त्यांची लढत महायुतीचे संदीपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याशी होत आहे. आपली ही शेवटची लोकसभा निवडणुक असल्याचे भावनिक आवाहन चंद्रकांत खैरे यांनी प्रचार सभांमधून केले होते. त्यामुळे उद्याच्या मतदान आणि चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT