Chnadrakant Patil-Koshyari News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Patil : आधी राज्यपाल, आता चंद्रकांतदादा अन् पुन्हा औरंगाबाद..

Bjp : आता चंद्रकांत पाटलांना या नव्या वादावरून राजीनामा द्यावा लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : भाजप नेत्यांना झालय तरी काय? असा प्रश्न पडावा अशी एकामागून एक वादग्रस्त विधाने तीही महापुरूषांबद्दल केली जात आहेत. Bjp भाजप नेत्यांमध्ये सध्या महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान केले. त्यावरून अजूनही राज्यात त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आंदोलने सुरू आहेत.

त्यातच आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण देत त्यांनी शिक्षण संस्था उभारण्यासाठी भीक मागून निधी गोळा केला असे वादग्रस्त विधान केले. (Marathwada) विशेष म्हणजे हे विधान त्यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असतानाच केले त्यामुळे महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचे औरंगाबाद हे डेस्टिनेशन ठरू पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

चंद्रकांत पाटील बोलायला फटकळ आहेत, याआधी देखील त्यांनी आपल्या अशा फटकळ बोलण्यातून वाद ओढावून घेतलेला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर आवडीचे खाते मिळाले नाही म्हणून ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. शिक्षण खात्याचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी तोलून-मापून बोलणे अपेक्षित आहे.

मात्र सरकारी अनुदानावर शैक्षणिक संस्थांनी आता अवलंबून राहू नये, हे सांगण्यासाठी त्यांनी ज्या महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख केला तो चुकीच्या पद्धतीने आणि अवमान करणाऱ्यांच्या रांगेत त्यांना नेऊन बसवणारा ठरला. यावरून आता चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. पैठण येथील संत पिठाच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य हे सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता भिक मागून केले असे विधान केले.

यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी सारवासारव सुरु केली आहे. परंतु त्यांनी केलेले हे विधान जाणून-बुजून केल्याचा आरोप होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याच औरंगाबाद येथील विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. शिंदे सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा देखील शिवराळ भाषेत उल्लेख केला होता. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील या दुसऱ्या मंत्र्यांनी महापुरुषांचा अवमान करत राजकीय वातावरण तापवले आहे.

शिंदे सरकार मधील मंत्र्यांच्या या बेताल वक्तव्यावर भाजपतील वरिष्ठ नेत्यांचा अंकुश नसल्याचेच यावरून दिसून येते. भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील महापुरुषांविरोधात मुद्दाम वादग्रस्त विधाने करत आहेत, त्यांना बदनाम करण्याचा भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप देखील केला जात आहे. अशावेळी भाजपच्या नेत्यांनी आणि सरकारमधील मंत्र्यांनी तोंडावर थोडा ताबा ठेवणे आवश्यक आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानानंतर भाजपच्या नेत्यांनी आधी त्यांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकरण जास्त चिघळल्यामुळे नंतर वरवरचा विरोध दर्शवत वेळ मारून नेण्याचा प्रयत्नही केला. मात्र एक प्रकरण संपत नाही तोच चंद्रकांत पाटलांनी विरोधकांच्या हाती पुन्हा एक नवा मुद्दा दिल्याने भाजप नेत्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. आता चंद्रकांत पाटलांना या नव्या वादावरून राजीनामा द्यावा लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT