mbadas Danve Imtiyaz Jaleel sarkarnama
मराठवाडा

Shivsena-AIMIM News : हात तोडण्याची भाषा अन् हातमिळवणी, इम्तियाज-दानवे समोरासमोर

Jagdish Pansare

Loksabha Election : मतदानाच्या आदल्यादिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी धमकावल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. या संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित करत अंबादास दानवे यांनी आमच्याकडे बोट दाखवाल, आमच्या पदाधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न कराल तर हात तोडून टाकू, असा गर्भित इशारा या माध्यमातून दानवे यानी इम्तियाज जलील यांना दिला होता.

मात्र, आज (सोमवारी) प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर भेटी देताना हे दोघे ऐकमेकांच्या समोरासमोर आले आणि दोघांनी हातात हात घेत संवाद साधला. त्यामुळे काही तासांपुर्वी हात तोडण्याची भाषा करणाऱ्या दानवेंनी इम्तियाज यांच्याशी केलेली हातमिळवणी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. एवढेच नाही तर आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक असलो तरी वैयक्तिक मित्र आहोत. संध्याकाळी आम्ही एकत्र बसू, असेही दानवे माध्यमांना बोलतांना म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इम्तियाज जलील यांना शुभेच्छा देणार का? असे विचारले तेव्हा मी त्यांना शुभेच्छा कशा देणार? ते आमचे विरोधक आहेत, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रश्नच नाही. काल मी त्यांच्यावर टीका केली होती, यापुढेही करत राहणार. आमचे राजकीय मतभेद आहेत. वैयक्तिक नाही. त्यामुळे एकमेकांना भेटल्यावर सलाम-दुआ, रामराम-शामशाम ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे आम्ही भेटलो. हात मिळवला याच्यात आश्चर्य वाटण्यासारख काही नाही, असे स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिले.

इम्तियाज जलील यांनी मात्र आपण उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे यांना शुभेच्छा दिल्याचे सांगितले. वेगवेगळ्या राजकीय पक्षात असलो तरी आमचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. मी पत्रकारिता क्षेत्रात असल्यापासून अंबादास दानवे यांच्यासोबत माझी मैत्री आहे. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या नसल्या तरी मी मात्र विरोधी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकासकामाच्या मुद्यावर विरोधकांनी मत मागितली पाहिजे, जाती-धर्माच्या नावावर नाही, हीच माझी अपेक्षा आहे. शेवटी कोणाला निवडून द्यायचं हे जनता ठरवणार आहे. चार जूनच्या मतमोजणीत ते समोर येईलच, असा टोला इम्तियाज यांनी यावेळी लगावला.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT