Chhhatrapti Sambhajinagar  Sarakarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambajinagar News : महापालिकेच्या बुलडोझरवर दगडफेक, पोलिसांची डोकी फुटली...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambajinagar News : अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिस बंदोबस्तात गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमावाने दगडफेक करत हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अतिक्रमण हटाव पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची डोकी फुटली. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगवले.

ही घटना शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन भागातील विश्रांतीनगरजवळ घडली. महापालिका आणि पोलिसांच्या पथकावर नागरिकांनी अचानक दगडफेक केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या सात ते आठ नळकांड्या फोडल्या. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, सर्व अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे. विश्रांतीनगरमध्ये महापालिका, पोलिस आणि नागरिकांमध्ये अतिक्रमण हटविण्यावरून बुधवारी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान वाद झाला.

गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने काही दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या. त्यानंतर बुधवारी सकाळी महापालिका पथक पोलिसांसह या ठिकाणी अतिक्रमण हटविण्यासाठी गेले. सुरुवातीला महापालिका पथकाने अतिक्रमणधारकांना कारवाईची माहिती दिली. त्यानंतर माइकवरून सूचना केली. अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच अचानक नागरिकांनी विरोध करत आधी महापालिका पथक आणि त्यानंतर पोलिसांनावर दगडफेक सुरू केली.

नागरिकांनी कारवाईला विरोध करत पथकावर दगडफेक सुरू केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली, मग पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगविले. त्यानंतर पथकाने जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण उद्ध्वस्त केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दगडफेकीत आठ पोलिस कर्मचारी, पोलिस निरीक्षक राजेश यादव जखमी झाले आहेत.

महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचे पथक गेले होते. महापालिकेच्या 1975 च्या विकास आराखड्यात शिवाजीनगर ते रामनगर असा 80 फुटांचा रस्ता नमूद केला आहे. या रस्त्यावर विश्वकर्मा चौक ते झेंडा चौक दरम्यान वीस बाय तीस आकाराचे प्लॉटिंग टाकून अनेकांना विक्री करण्यात आली होती. या ठिकाणी छोटे-मोठे पत्र्याची घरे तयार करून अनेकजण राहतात. नऊ वर्षांपूर्वी या ठिकाणची अतिक्रमणे काढण्याचा महापालिकेने प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी ही कारवाई अर्ध्यावर राहिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या रस्त्यावरील मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांना घरे रिकामी करण्यासाठी 72 तासांचा वेळ देण्यात आला होता. हा वेळ बुधवारी संपल्यामुळे सकाळी दहा वाजता अतिक्रमण हटाव विभागाचे पथक (Carporation Squad), मुकुंदवाडी पोलिसांचे (Mukundwadi Police Station) पथक या ठिकाणी आले. पथक पाहताच 200 ते 300 नागरिकांचा जमाव या ठिकाणी जमा झाला. त्यांनी सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे कारवाई करू नका, आम्हाला मोबदला दिल्याशिवाय आम्ही जागा रिकाम्या करून देणार नाही, अशी मागणी करत कारवाईला विरोध केला.

अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे दिली जातील, दहावी-बारावी परीक्षा असल्यामुळे कारवाई थांबविता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे तणाव वाढला. त्यानंतर नागरिक, महिलांनी पोलिस, महापालिकेच्या पथकाच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली. त्यात सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यासह आठ ते नऊ पोलिस कर्मचारी जखमी झाले. महापालिकेचे इमारत निरीक्षक रामेश्वर सुराशे यांच्या चेहऱ्यावरही दगड लागला.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT