Latur Lok Sabha 2024 Analysis
Latur Lok Sabha 2024 Analysis Sarkarnama
मराठवाडा

Latur Lok Sabha 2024 Analysis: काका-पुतण्याची जोडी काँग्रेसचा हात मजबूत करतील का?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील लोकसभेच्या लातूर मतदारसंघात (Latur Lok Sabha Constituency 2024)महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे निवडून येणार अशी चर्चा आणि विविध सर्व्हेमधून सुरू आहे. 7 मे रोजी मतदान झाल्यापासून काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह दांडगा आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात मात्र शांतता आहे.

2009 मध्ये दिवंगत विलासराव देशमुख ​​(Vilasrao Deshmukh) यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात जयवंत आवळे यांना उमेदवारी देऊन एक प्रयोग केला होता. एवढेच नाही तर तो यशस्वी करून दाखवत आवळे यांना निवडून आणले होते. पण त्यानंतरच्या सलग दोन निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागला.

विलासराव देशमुख यांच्या पश्चात जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृत्व करणारे त्यांचे चिरंजीव अमित देशमुख (Amit Deshmukh) धीरज देशमुख आणि त्यांचे मार्गदर्शक माजी मंत्री विलासरावांचे भाऊ दिलीप देशमुख यांना मात्र भाजपला रोखता आले नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप लातूरमध्ये हॅट्रीकच्या तयारीत आहे, तर अमित देशमुख, दिलीपराव देशमुख या काका-पुतण्याच्या जोडीने यावेळी मात्र महायुतीची चांगलीच दमछाक केल्याचे चित्र आहे.

काँग्रेसकडून शिवाजी काळगे यांच्यासारखा नवा, उच्चशिक्षित चेहरा देत त्यांनी लातूरच्या मतदारांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे प्रचारात दिसून आले. गेल्या कित्येक वर्षानंतर काँग्रेस लातूर लोकसभा निवडणुकीत जिंकण्याच्या जिद्दीने लढताना दिसली. सगळे देशमुख कुटुंबच काँग्रेसचा हात बळकट करण्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र होते. अगदी काळगे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देशमुख कुटुंब सजग होते.

1962 पासून झालेल्या लातूर लोकसभा मतदारसंघातील पंधरा पैकी तब्बल अकरावेळा काँग्रेसने इथे विजय मिळवलेला आहे. एवढी मजबूत पकड असताना शेतकरी कामगार पक्षाचा एक अपवाद वगळता 2004 मध्ये भाजपने ही जागा काँग्रेसकडून खेचून घेतली होती. पण 2009 मध्ये काँग्रेसने पुन्हा कमबॅक करत भाजपला रोखले. पण विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाच्या आभावात झालेल्या 2014-2019 च्या सलग दोन निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा पराभव झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता अमित देशमुख-दिलीपराव देशमुख ही काका पुतण्याची जोडी भाजपला रोखून ही जागा काँग्रेसकडे पुन्हा खेचून घेण्यात यशस्वी होतात का? हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल. मतदानाचा वाढलेला टक्का, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेला प्रतिसाद यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

विजयाचे दावे महाविकास आघाडीकडून केले जात आहेत. आता हा काँग्रेसचा आत्मविश्वास आहे, की भाजपच्या विजयाच्या वादळापुर्वीची शांतता यासाठी चार जूनची वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, लातूर काँग्रेसने आभार बैठका घ्यायला सुरूवात केली आहे.

महाविकास आघाडी घटक पक्षाचे पक्ष निरीक्षक, बुथ प्रमुख, पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी यांची संवाद बैठक नुकतीच उमेदवार शिवाजी काळगे यांनी आयोजित केली होती. या बैठकीला दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख आवर्जून हजर होते. त्यांच्याशी संवाद साधत या निवडणुकीत सक्रिय योगदान दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT