Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency Result : लोकसभेच्या आखाड्यात उमेदवारांच्या खासदारकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. छत्रपती संभाजीनगर मतदार संघाची बीड बायपासवरील एमआयटी महाविद्यालयात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी 3 वाजता चित्र स्पष्ट होणार असून सायंकाळी पाच- सहापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी सोमवारी (ता.3 ) मतमोजणीची रंगीत तालीम करण्यात आली. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान झाले. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर पूर्व, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, कन्नड, वैजापूर व गंगापूर या सहा विधानसभा मतदार संघात मिळून 63.07 टक्के मतदान झाले आहे.
मतमोजणीच्या 27 फेऱ्या होणार असून दुपारी 3 वाजल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. तर सायंकाळी सहा पर्यंत निकाल लागणे अपेक्षित असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील 20 लाख 59 हजार 710 मतदारांपैकी 12 लाख 99 हजार 40 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मंगळवारी (ता.चार) सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तथापि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतमोजणीच्यावेळी कोणत्याही अडचणी येवू नयेत, त्रुटी राहू नयेत यासाठी सोमवारी (ता.तीन) मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. मतमोजणी यंत्र वगळता खऱ्या प्रक्रियेप्रमाणे रंगीत तालीम करण्यात आली. दुपारी सव्वा चार वाजता रंगीत तालमीची सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी देवेंद्र कटके यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना योग्य त्या सूचना दिल्या. प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय पाच मतमोजणीच्या फेऱ्या याप्रमाणे 30 फेऱ्या झाल्या. निवडणूक कर्मचारी, वृद्ध, दिव्यांग मतदारांचे 3973 टपाली मतदान झाले आहे. तर सर्विस वोटर ( सैनिक मतदार ) च्या 1510 मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या, पैकी आजपर्यंत 660 सर्विस वोटरची मते प्राप्त झाली आहेत.
मतमोजणीच्या काही वेळ आधीपर्यंत ही मते प्राप्त होतील. सैनिकांची मते पोष्टामार्फत मतमोजणीच्या ठिकाणी आठ वाजण्यापूर्वी येतील. यासाठी तीन पोस्टमन व एक सुपरवायजर समकक्ष कर्मचाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे चार वाजता देवगिरी एक्सप्रेसने सर्विस वोटरच्या मतांचे टपाल येईल.
प्रत्येक विधासभा मतदार संघासाठी कलर कोड देण्यात आले आहेत. त्या मतदार संघातील मतदान यंत्रांची ने आण करण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनाही त्याच कलरचे टी शर्ट देण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबलवर मतमोजणी होईल. मतमोजणीच्या टेबलजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीच्या बाहेरील बाजूने उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
(Edited - Mayur Ratnaparkhe )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.