Municipal Corporation Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar News: महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष-गटनेता ठरले, आता स्थायी समितीसाठी 'लाॅबिंग',कुणाची वर्णी लागणार?

Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली आहे. भाजपाने सर्वाधिक 57 जागा जिंकत महापौर पद घेतले. तर एका जागेची गरज असताना शिवसेनेला सोबत घेत त्यांना उपमहापौर पद दिले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली आहे. भाजपाने सर्वाधिक 57 जागा जिंकत महापौर पद घेतले. तर एका जागेची गरज असताना शिवसेनेला सोबत घेत त्यांना उपमहापौर पद दिले. एमआयएमचा विरोधी पक्षनेता ठरला, सर्व पक्षाचे गटनेते ठरले त्यानंतर आता स्थायी समिती सभापती पदावर डोळा असलेल्यांनी जोरदार लाॅबिंग सुरू केले आहे.

महापालिकेच्या राजकारणात स्थायी समिती सभापती पद हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. महापालिकेत भाजपा-शिवसेना युती असली तरी हे पद भाजप आपल्याकडेच घेणार हे स्पष्ट आहे. आता या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सभापती पदाची निवड होणार आहे.

स्थायी समितीवर 16 सदस्यांची निवड, तसेच महिला व बाल कल्याण, वैद्यकीय साहाय्य व आरोग्य समिती, शहर सुधार, शाळा समिती, गलिच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाज कल्याण समितीसाठी सदस्यांची निवड करण्यासाठी पाच मार्चला महापालिकेच्या सर्वसाधारण सभा होणार आहे. आर्थिक नियोजनाची जबाबदारी असलेल्या स्थायी समितीवर आणि त्यानंतर सभापतीपदी वर्णी लागावी यासाठी भाजपच्या नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

महापौरपदाची संधी हुकलेल्या नगरसेवकाला स्थायी समिती सभापतिपद देऊन नाराजी दूर करण्याचे पक्षाचे प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्थायी समितीला विशेष महत्त्व आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर विजयी झाला. भाजपचे 57 तर शिवसेनेचे 13 असे 70 नगरसेवक युतीकडे आहेत. भाजपचे संख्याबळ पाहती आगामी पाच वर्षे स्थायी समिती सभापतिपद भाजपकडे राहण्याची शक्यता आहे.

प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रमाणात 16 सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार सर्वाधिक 57 नगरसेवक असलेल्या भाजपकडून आठ सदस्य निवडले जातील. त्यापाठोपाठ 33 नगरसेवक असलेल्या एमआयएमकडून पाच सदस्य, शिवसेनेचे 13 नगरसेवक असल्याने दोन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक सदस्य राहण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण सभेत गटनेत्यांकडून नावे कळविण्यात आल्यानंतरच सदस्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होईल.

या 16 सदस्यातून स्थायी समिती सभापतीची निवड होईल. ही निवड दोन वर्षासाठी असलीतरी दरवर्षी आठ नगरसेवकांना स्थायी समितीचे सदस्यत्व सोडावे लागणार आहे. सुरवातीच्या वर्षासाठी आठ सदस्यांना एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. त्यानंतर चिठ्ठ्या टाकून आठ जणांना सदस्यत्व सोडावे लागेल.

या विशेष सभेत शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण आणि शहर सुधार समितीसाठी प्रत्येकी सदस्य निवडले जाणार आहेत. त्यातून सभापती निवडले जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT