छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर कडाकडा भांडणाऱ्या आणि स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आल्यानंतर महापौर, उपमहापौरपदासह सर्वच पदांवर दावा सांगणाऱ्या भाजपने अखेर बहुमतासाठी शिवसेनेला सोबत घेतले आहे. भाजपचा महापौर कोण होणार यावर गेल्या काही दिवसांपासून मोठा खल सुरू होता. डझनभर इच्छुकांपैकी 2 नावे भाजपाच्या प्रदेश समितीकडे पाठवण्यात आली होती. यात समीर राजूरकर आणि अनिल मकरी यांच्या नावाचा समावेश होता. आज प्रदेश समितीने महापौरपदासाठी समीर राजूरकर यांचे नाव निश्चित केले आहे. तर उपमहापौर पदावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची निवड करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 33 नगरसेवकांसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एमआयएम पक्षाला रोखण्यासाठी भाजप-शिवसेनेने समीर राजूरकर, राजेंद्र जंजाळ यांच्या रूपाने आक्रमक आणि तरुण चेहरे दिले आहेत. समीर राजूरकर हे भाजपचे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. समर्थ नगर प्रभागातून ते निवडून आले आहेत. प्रशासन आणि शासकीय योजना यांची इत्यंभूत माहिती आणि अभ्यास असणाऱ्या समीर राजूरकर यांची महापौरपदी निवड करत भाजपने मोठी खेळी केली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत अनेक नावे असताना समीर राजूरकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. कोअर कमिटीतील सदस्य मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे या सर्वांच्या सहमतीनंतर प्रदेश समितीने समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
शिवसेनेला सोबत घेत युतीधर्मही पाळला
भाजपने स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणत काठावरचे बहुमत मिळवले होते. बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या एका नगरसेवकाची आवश्यकता असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडून आलेल्या एकमेव नगरसेवकाने अटी शर्तीसह पाठिंबा देण्याचे मान्य केले होते अशी चर्चा आहे. परंतु भाजपने निवडणुकीआधी युती तोडणाऱ्या शिवसेनेला सोबत घेत उपमहापौरपद देण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे 13 नगरसेवक निवडून आलेले आहेत. तरीही राज्यातील युतीचा धर्म पाळत भाजपने उपमहापौरपद देत शिवसेनेचा योग्य सन्मान केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
उपमहापौर पदी राजेंद्र जंजाळ यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याशी मध्यंतरीच्या काळात त्यांचे संबंध कमालीचे ताणले गेले होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने त्या त्याचा परिणाम युती तुटण्यावर झाला होता. संजय शिरसाट यांच्याशी मतभेद वाढल्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याशी जवळीक वाढवली होती. आता उपमहापौर पदी जंजाळ यांची वर्णी लागल्यामुळे प्रदीप जयस्वाल यांची सरशी झाल्याचे बोलले जात आहे. एकूणच प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमला सभागृहात तोंड वर न काढू देण्यासाठी भाजपने समीर राजूरकर तर शिवसेनेने राजेंद्र जंजाळ यांच्यासारख्या तरुण आणि आक्रमक चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे.
एमआयएमचा फुसका बार
दोन दिवसांपूर्वी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आम्ही भाजपाला धक्का देऊ असे विधान केले होते. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही कोणालाही सोबत घेऊ शकतो असे सांगत इम्तियाज जरी यांनी काही काळ हवा निर्माण केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मात्र लोकशाहीत जनतेच्या मतांचा आदर केला पाहिजे, भाजपकडे जवळपास स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे एमआयएमचा महापौर किंवा इतर कुठलाही प्रयोग शक्य नसल्याचे सांगत इम्तियाज जलील यांचा दावा फेटाळला होता. त्यामुळे एमआयएमचा धक्का देण्याचा दावा फुसका बार ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.