Sandipan Bhumre Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre : या भूमीने मला दिल्लीपर्यंत पोहचवले; गावातल्या सत्काराने संदीपान भुमरे भारावले

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील महायुतीचे एकमेव निवडून आलेले लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा कौतुक सोहळा काही केल्या थांबत नाही. पैठण विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेल्या संदीपान भुमरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्याचे आदेश दिले होते.

पैठण विधानसभा मतदारसंघ हा या लोकसभा मतदारसंघाचा भाग नसताना भुमरे Sandipan Bhumre यांनी हे आव्हान स्वीकारले. एवढेच नाही तर मराठवाड्यात दिग्गज भाजपचे नेते, मंत्री पराभूत होत असताना संदीपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवत महायुतीची लाज राखली. त्यामुळे त्यांच्या विजयाचे महत्व तितकेच वाढले.

तब्बल 1 लाख 35 हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी गेल्या दोन आठवड्यापासून खासदार भुमरे यांचे जिल्हाभरात सत्कार-समारंभ सुरू आहेत. त्यात दिल्लीत नव्या सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन असल्याने संदीपान भुमरे यांना तिथेही हजेरी लावावी लागली. त्यामुळे गावच्या लोकांनाच खासदार भुमरे यांचे कौतुक करण्यासाठी वाट पहावी लागली.

अखेर आज संदीपान भुमरे यांचा आपल्या जन्मभूमीत म्हणजेच पैठण विधानसभा मतदारसंघातील पाचोड गावात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. जेसीबीतून फुलांचा वर्षाव, मोठे हार, ढोल-ताशांचा दणदणाट आणि हजारो समर्थकांच्या गर्दीने फुलून गेलेले रस्ते अशा वातावरणात भुमरे यांचे पाचोडमध्ये स्वागत झाले.

गावातल्या लोकांचे प्रेम, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भुमरे भारावून गेले होते. पैठण तालुक्यातील पाचोड या गावात माझा जन्म झाला. याच भूमीत मी वाढलो, मेहनत करून आज दिल्लीपर्यंत पोहोचलो. या मातीने या माणसांनी आजवर खूप प्रेम दिले. पाचोड येथे खासदार पदी बहुमताने निवडून आल्याबद्दल नागरी सत्कार सोहळा आज पार पडला.

हा दिवस भारावून टाकणारा होता, अशा भावना भुमरे यांनी यावेळी व्यक्त केल्या. पाचोड ग्रामपंचायतीपासूनच संदीपान भुमरे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. ग्रामपंचायत ते दिल्लीत खासदार पदापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात पाचोड-पैठणचे मोठे महत्व आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT