Imtiaz Jaleel  Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : एमआयएम-भाजपचे नगरसेवक पुन्हा भिडले, कचरा संकलन केंद्राच्या मुद्यावरून इम्तियाज जलील यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप!

Aimim-BJP Controversy politics : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपची सत्ता आली असून सतत एमआयएमशी खटके उडताना दिसत आहेत.

Jagdish Pansare

  1. संभाजीनगर महापालिकेत भाजप आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये सतत वाद होत असून पुन्हा एकदा संघर्ष उफाळला आहे.

  2. हडको एन-12 येथील कचरा संकलन केंद्रावरून स्थायी समितीच्या बैठकीत जोरदार वाद झाला.

  3. भाजपने इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे.

chhatrapati sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून एमआयएम आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये सात्याने खटके उडत आहेत. पहिल्याच सर्वसाधारण सभेत शहराचे नामांतर केल्याबद्दल सरकारच्या अभिनंदन ठराव करण्यात आला. मात्र या ठरावाला विरोध करत एमआयएमने बायकॉट केले होते. तर भाजपच्या सभापतीने छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला नाही तर एक रुपयाही देणार नाही, असा इशारा देत एमआयएमला डिवचले होते.

आता आज स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील हडको, एन-12 मधील कचरा संकलन केंद्रावरून एमआयएम आणि भाजपचे नगसेवक एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरले. इम्तियाज जलील यांनी भाजपाचे नगरसेवक हे गुजराती कंपनीच्या कंत्राटदारांसाठी भांडत आहेत, तर आमचे नगरसेवक हे जनतेच्या भल्यासाीठी भाजपशी लढत आहेत, असा दावा केला.

तर इम्तियाज जलील हे ब्लॅकमेलर आहेत, ते सतत ब्लॅकमेलिंग करतात. विकास कामात खोडा आणणे आणि त्याला विरोध करणे यातून हेच स्पष्ट होते, असा पलटवार भाजपने केला आहे. हडको एन-12 भागातील प्राथमिक कचरा संकलन केंद्र 2018 पासून कार्यरत असताना नव्या कंपनीकडे काम वर्ग होत असताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आंदोलन का करत आहेत? त्यांना कंत्राटदाराला ब्लॅकमेल करायचे आहे का? असा प्रश्‍न महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे सदस्य राज वानखेडे यांनी केला.

त्यावर एमआयएम पक्षाचे सदस्य आक्रमक झाले. शा‍ब्दिक चकमकीनंतर सभापती अनिल मकरिये यांनी या प्रकरणी 24 तासांच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या स्थायी समितीची सोमवारी अनिल मकरिये यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला सुरवात होताच राज वानखडे यांनी हडको एन-12 येथील प्राथमिक कचरा संकलन केंद्राचा मुद्दा उपस्थित केला.

याठिकाणी आंदोलनाला परवानगी होती का? या आंदोलन दरम्यान महापालिकेचे काम थांबविण्यात आले का? याच खुलासा करण्याची त्यांनी मागणी केली. त्यावर उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी आंदोलना दरम्यान काम थांबविण्यात आले होते, असे स्पष्टीकरण दिले. उपायुक्त अपर्णा थेटे यांनी कर्तव्य पार पाडत असताना महापालिकेच्या कामकाजात कोणी अडथळा आणत असेल तर गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असा खुलासा केला.

त्यावर वानखेडे यांनी प्रशासनाने आत्तापर्यंत आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल का केला नाही? याचा खुलासा करण्याची मागणी केली. एमआयएमचे नगरसेवक फक्त सोशल मिडीयावर चमकण्यासाठी प्रशासनावर दादागिरी करत आहेत. विरोधीपक्षनेत्याने वापरलेले भाषा योग्य आहे का? ही दादागिरी खपवून घेणार नाही. त्यामुळे या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा. विकासात्मक कामे करून घेण्यासाठी महापालिकेत पदाधिकार आहेत, आयुक्त आहेत.

सर्वसाधारण सभा, स्थायी समितीमध्ये विषय मांडता येतात पण एखाद्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यावर अरेरावी करायची? त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा हे योग्य नाही. 2018 पासून या ठिकाणी कचरा संकलन केंद्र आहे. महापालिका नव्या कंपनीकडे कचऱ्याचे काम वर्ग करत असताना इम्तिजाय जलील आंदोलन का करत आहेत? त्यांचे आंदोलन कंत्राटदाराला ब्लॅकमेल करण्यासाठीच आहे, असा आरोप वानखेडे यांनी केला.

एमआयएम नगरसेवकांनी यावर आक्षेप घेत माजी खासदार जनतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी गेले होते. त्यांनी अरेरावी केलेली नाही. उठसूट त्यांचे नाव घेण्याची गरज नाही, असे खान अब्दुल मतीन, मझहर पठाण यांनी सुनावले. त्यावरून भाजप नगरसेवक आक्रमक झाले. काही काळ शाब्दीक चकमक झाल्यानंतर सभापती मकरिये यांनी या प्रकरणी 24 तासात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

महापालिकेने गुजरातच्या कंपनीला कचरा संकलनाचे काम दिले आहे. या कंपनीतर्फे सलीम अली सरोवरासमोर जुन्या कचरा संकलन केंद्रावर नवी मशिनरी बसविली जात आहे. याच परिसरात इम्तियाज जलील राहतात. त्यांनी कचरा संकलन केंद्राला विरोध करत आंदोलन केले. याठिकाणी कचरा संकलन करू दिले जाणार नाही, असा इशारा इम्तियाज यांनी दिला.

दुसरीकडे आयुक्त अमोल येडगे यांनी खुलासा करताना येथील काम थांबणार नाही. उपायुक्तांकडून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. महापालिका अधिकाऱ्यांवर कोणीही दबाव आणू नये. काही प्रश्‍न असतील तर ते मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे. लवकरच कामकाजासंदर्भातील नियमावली तयार केली जाईल, असे स्पष्ट केले.

FAQs :

1. हा वाद कुठे झाला आहे?
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत हा वाद झाला आहे.

2. वादाचा मुख्य मुद्दा काय होता?
हडको एन-12 येथील कचरा संकलन केंद्र हा मुख्य मुद्दा होता.

3. कोणत्या पक्षांमध्ये संघर्ष झाला?
भाजप आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये संघर्ष झाला.

4. कोणावर आरोप करण्यात आले?
इम्तियाज जलील यांच्यावर भाजपने आरोप केले.

5. याचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
महापालिकेत राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT