Chhatrapati Sambhajinagar News : आम्हीच मोठे भाऊ असा दावा करत महापालिका निवडणुकीत युती तोडणाऱ्या शिवसेनाला आता भाजपनेही बेदखल केले आहे. स्वबळावर लढत 57 नगरसेवक निवडून आल्यामुळे शतप्रतिशत भाजपाचा महापौर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत बसणार हे निश्चित आहे. बहुमतापासून एका नगरसेवकाने दूर असलेल्या भाजपने राष्ट्रवादीसह इतर पक्षाचे नगरसेवक आम्हाला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार असल्याचा दावा केला आहे.
महापालिकेत सत्तेसाठी भाजपला आता शिवसेनेची गरज उरलेली नाही. त्यामुळे उगाच सोबत घेऊन ओझे वाहण्यापेक्षा स्वबळावरच 5 वर्ष महापौर पद आणि इतर महत्वाची पदे आपल्याकडे ठेवण्याचा स्थानिक भाजप नेत्यांचा प्रयत्न दिसतो. 10 फेब्रुवारीला महापौर पदाची निवड केली जाणार आहे. परंतु अद्याप भाजपकडून शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्याबाबतचा प्रस्ताव दिला गेलेला नाही. तसेच शिवसेनेकडूनही सत्तेतील सहभागा विषयी कोणी फार उत्सूकता दाखवलेली नाही.
एकूणच काय तर भाजपाने शिवसेनेला महापालिकेतील सत्तेपासून बेदखलच केल्याचे चित्र आहे. मुंबई, कल्याण डोंबिवली व इतर महापालिकेत भाजपाला शिवसेनेच्या मदतीची गरज आहे. तिथे भाजपाचे नेते आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात? यावर संभाजीनगरमध्ये भाजपसोबत सत्तेत जायचे की नाही? किंवा भाजप शिवसेनेला सोबत घेणार की नाही? हे स्पष्ट होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपाने शिवसेनेसोबत युतीचे प्रयत्न केले होते. त्यावेळी ताणून घेतल्याचा वचपा आता भाजप काढत आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपला हवा एक नगरसेवक...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत बहुमतासाठी भाजपाला केवळ एका नगरसवेकाची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेसकडे प्रत्येकी एक नगरसेवक तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा, वंचित आघाडीचे चार नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर शिवसेनेकडे 13 नगरसेवक आहेत. अशा वेळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकमेव नगरसेवकाला गळाला लावत भाजप मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेतून बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न करण्याची अधिक शक्यता आहे.
गेली 20 वर्ष महापालिकेत शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला. भाजपाच्या नेत्यांना शिवसेनेच्या दबावातच काम करावे लागायचे. आता पहिल्यांदा भाजपाने स्वबळावर सर्वाधिक 57 नगरसेवक निवडून आणत शिवसेनेला महापालिकेत थेट तिसऱ्या क्रमांकावर लोटले आहे. त्यामुळे ऐरवी हा आवाज कुणाचा? म्हणणाऱ्या शिवसेनेचा आवाज दबल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.