Rajendra Janjal and sanjay shirsat  Sarkarnama
मराठवाडा

Rajendra Janjal On Sanjay Shirsat : मुलीला उपमहापौर करायचं होतं, म्हणून मला विरोध केला; राजेंद्र जंजाळ पुन्हा पालकमंत्र्यांना भिडले!

Chhatrapati Sambhajinagar deputy mayor election: एकनाथ शिंदे यांनी थेट आदेश पाळा म्हणत पत्रच काढले. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची सरशी झाल्यानंतर आता महापालिकेतील गटनेते पदावरूनही ते संजय शिरसाट यांना भिडले आहेत.

Jagdish Pansare

Shivsena News : पालकमंत्री संजय शिरसाट यांचा विरोध डावलून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांनी हिरवा कंदील मिळवला होता. शिरसाटांनी आदळआपट करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. समर्थक माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना उपमहापौर पदासाठी अर्ज भरायला लावून वापरलेले दबाव अस्त्रही उलटले.

एकनाथ शिंदे यांनी थेट आदेश पाळा म्हणत पत्रच काढले. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची सरशी झाल्यानंतर आता महापालिकेतील गटनेते पदावरूनही ते संजय शिरसाट यांना भिडले आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गटनेते पदासाठी त्र्यंबक तुपे यांच्या नावाला पसंती दर्शवली असल्याचा दावा केला.

यावर राजेंद्र जंजाळ यांनी आपल्याला अद्याप तशा कुठल्याही सूचना नाहीत, शिंदेसाहेब ठरवतील तोच गटनेता होईल, असे म्हणत पुन्हा एकदा संजय शिरसाट यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. निवडून आलेल्या शिवसेनेच्या 13 पैकी 10 नगरसेवकांचा गटनेते पदासाठी त्र्यंबक तुपे यांना पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. परंतु हा दावा जंजाळ यांना मान्य नाही. शिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकृत निरोप येत नाही तोपर्यंत गटनेते पदाचा निर्णय होणार नाही, असे जंजाळ यांनी स्पष्ट केले.

मुलीला उपमहापौर करायचे होते..

उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी संजय शिरसाट यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला. आपली मुलगी हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करण्यासाठी शिरसाट यांनी माझ्या उमेदवारीला विरोध केला. पक्षात काम करणाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी आपली सुरूवाती पासूनची भूमिका राहिली आहे. संजय शिरसाट हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांची देखील हीच भूमिका असली पाहिजे. परंतु महापालिका निवडणुकीत आमच्या पक्षाचे जे पंधरा नगरसेवक पराभूत झाले, त्यांच्या मनामध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात संताप आहे.

उपमहापौरपदी जंजाळ यांची निवड झाल्यानंतर मोठी विजयी मिरवणूक त्यांच्या समर्थकांनी काढली. घोषणाबाजी आणि ट्रकभर गुलालाची उधळण करण्यात आली होती. या मिरवणुकीत लावण्यात आलेल्या बॅनरवर शेजारच्या जालना, सिल्लोडचे आमदार अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार यांचे फोटो होते. पण पालकमंत्री संजय शिरसाट यांना स्थान नव्हते. यावरून जंजाळ समर्थकांमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल किती संताप होता हे दिसून आले.

आता महापालिकेतील शिवसेनेच्या गटनेता निवडीवरून पुन्हा जंजाळ विरुद्ध शिरसाट असा संघर्ष पहायला मिळत आहे. येत्या 17 फेब्रुवारीपर्यंत ही निवड करायची आहे. शिरसाट यांना त्र्यंबक तुपे यांना या पदावर बसवायचे आहे. पण त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर शिक्कामोर्तब करावे, अशी भूमिका जंजाळ यांनी घेतली आहे. उपमहापौर पदावर मुलीची वर्णी लावण्यात अपयश आल्यानंतर आता गटनेते पदही शिरसाट यांच्या समर्थकाला मिळणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT