Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे निकाल हे एकनाथ शिंदेंची अन् उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेनेच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे ठरले आहेत. जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्री संजय शिरसाट यांना स्वतःचा मतदारसंघच राखता आला नाही, तिथे संपूर्ण शहराची काय स्थिती? असा प्रश्न पडतो. महापालिका निवडणुकीत युतीची बोलणी करताना केलेल्या चुका, दाखवलेला तोरा आणि यातून तुटलेली युती ही शिंदेंच्या शिवसेनेला चांगलीच महागात पडली.
संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत, कन्या हर्षदा आणि मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषीकेश जैस्वाल हे निवडून आल्यामुळे किमान नेत्यांचे नाक तरी राहिले. नेत्यांची मुलं तुपाशी निष्ठावंत कार्यकर्ते उपाशी अशीच काहीसी अवस्था छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची झाली आहे. ज्या प्रभागात स्वतः संजय शिरसाट गेली कित्येक वर्ष राहत होते, सलग तीन टर्म म्हणजे पंधरा वर्षापासून आमदार आणि आता मंत्री म्हणून ते प्रतिनिधित्व करतात, त्याच प्रभागात भाजपचे चारही उमेदवार निवडून येतात? याला काय म्हणावे?
बरं या भागात शिरसाट यांनी विकासकामे केली नाहीत का? तर नक्कीच केली, तरीही मतदारांनी शिवसेनेला नाकारले आणि भाजपला कसे स्वीकारले? याचे आत्मचिंतन त्यांना करावे लागेल. एकाच घरात दोन तिकीटं दिल्यामुळे आधाची संजय शिरसाट यांच्यावर पक्षातील स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज होते. अशात मुला-मुलीलाच धोका होऊ नये यासाठी शिरसाट यांना सतर्क राहावे लागले. परिणामी ते दोघांच्या प्रभागातच अधिक गुंतले. पक्षाच्या इतर उमेदवारांना त्यांनी फारसा वेळच दिला नाही, अशी टीका आता त्यांच्यावर होऊ लागली आहे
महापालिका निवडणुकीत शिवसेना हाच मोठा भाऊ असले आणि महापौरही आमचाच असेल असा दावा संजय शिरसाट निवडणुकीपुर्वी करत होते. आता हा त्याचा विश्वास नाही तर अतिआत्मविश्वास होता हे निकालावरून स्पष्ट झाले आहे. चाळीस-पंचेचाळीस जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला जेमतेम 13 जागा जिंकता आल्या. त्यातही तीन जागा या शिरसाट यांची दोन मुलं आणि एक आमदार जैस्वाल यांच्या मुलाची आहे. म्हणजे त्याशिवाय शिवसेनेला फक्त दहा जागा जिंकता आल्या आहेत.
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पश्चिम मतदारसंघात येणाऱ्या शहरातील सहा प्रभागांपैकी केवळ एका प्रभागात शिवसेनेचे संपूर्ण पॅनल निवडून येऊ शकले. इतर प्रभागातून शिरसाट यांचा मुलगा-मुलगी आणि कुठे एक, कुठे दोन असे नगरसेवक निवडून आले. या उलट भाजप, एमआयएम आणि वंचितने या भागात मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या भागात चागंली मते मिळवली. संजय शिरसाट आणि त्यांच्या शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
महापालिकेतील पराभवानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना आता आत्मचिंतन करावे लागेल. जिल्ह्यात एक खासदार, सहा आमदार, मंत्री आणि पालकमंत्री पद असताना पक्षाची झालेली ही वाताहत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मारक ठरू शकते. पुढील नुकसान टाळायचे असेल तर शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही जिल्ह्याचा नव्याने आढावा घेऊन आवश्यक ते संघटनात्मक बदलही करावे लागतील. आता त्यासाठी मुहूर्त केव्हा लागतो? हे पहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.