Uddhav Thackeray:
Uddhav Thackeray:  Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray: संभाजीनगरात ठाकरेंची महिला आघाडी फुटली; खैरे समर्थक माजी महापौर कला ओझा शिंदे गटात

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या संभाजीनगर मतदारसंघातून (Chhatrapati Sambhajinagar)शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला.

या पराभवाचे पडसाद पक्षात आता उठायला लागले आहेत. गेल्या आठवड्यात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे कट्टर समर्थक माजी सभागृहनेता व नगरसेवक गजानन मनगटे, महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करीत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

त्यानंतर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या माजी महापौर कला ओझा यांच्यासह काही महिला पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आठवडाभरात दुसऱ्यांदा ठाकरे गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आगामी विधानसभा त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाला हा मोठा धक्का समजला जात आहे.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर जिल्ह्यातील अनेक आमदार शिंदे गटात गेल्यानंतरही स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत ठामपणे उभे होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याची खदखद पक्षात मोठ्या प्रमाणात होती.

संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे व मुंबईतील वरिष्ठ नेत्यांशी स्थानिक नेते भेटू देत नाही, बोलू देत नाही, असा आरोप करत महिला पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये गोंधळ घातला होता.

यामध्ये माजी महापौर कला ओझा आणि नुकत्याच शिंदे गटात प्रवेश केलेल्या प्रतिभा जगताप यांचा पुढाकार होता. उद्धव ठाकरेंना भेटू देत नसल्याचा आरोप करताना महिला आघाडीच्या या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यामुळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे त्यावेळी चांगले संतापले होते. एकूणच जिल्ह्यातील स्थानिक नेते महिला आघाडीचा वापर केवळ निवडणूक प्रचारासाठी करतात. इतर वेळी मात्र महिलांना डावलले जाते असा, आरोपही सातत्याने केला जात होता.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षात चलबिचल सुरू होती. त्यानंतर महिला आघाडीच्या प्रतिभा जगताप, माजी सभागृह नेता गजानन मनगटे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला धक्का दिला होता. विशेष म्हणजे हे दोघेही विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.

दानवे समर्थकांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर आता चंद्रकांत खैरे यांच्या आग्रहामुळे महापौर झालेल्या कला ओझा, उपजिल्हा संघटक अंजली मांडवकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत सत्ताधारी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

महिला आघाडीच्या या प्रवेशामागे आगामी महापालिका निवडणुकीतील उमेदवारी हे महत्त्वाचे कारण समजले जाते. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पाडला. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे, जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे, शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT