Jalpujan in Chhatrapati Sambhajinagar city by Devendra Fadnavis News Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnavis On Water Issue : छत्रपती संभाजीनगर शहरात वाढीव पाणी आता डिसेंबरला! मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला..

Citizens of Chhatrapati Sambhajinagar will have to wait until December for increased water supply : 26 एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रामुळे शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी कमी होणार आहे.

Jagdish Pansare

माधव इतबारे

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे काम अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत 200 एमएलडी वाढीव पाणी मिळेल तर मार्च 2026 पर्यंत योजनेचे संपूर्ण काम पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. यापूर्वी वाढीव पाण्यासाठी ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्यामुळे आता शहराची पाण्याची प्रतीक्षा दोन महिन्यांनी वाढली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते शनिवारी फारोळा येथील नव्या 26 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन करण्यात आले. शहराची पाणी पुरवठा योजना अनेक वर्षांपासून रखडली होती. पण अडचणींवर मात करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिकेने आजघडीला 82 टक्क्यांवर काम आणले आहे. शहराची पुढील 30 वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन या योजनेची आखणी करण्यात आली असून, 365 दिवस 24 तास पाणी मिळावे यासाठी नियोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शहराच्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेत महापालिकेचा (Chhatrapati Sambhajinagar) 822 कोटींचा स्वहिस्सा आहे. शहरातील लोकप्रतिनिधींनी महापालिकेची एवढी मोठी रक्कम टाकण्याची ऐपत नसल्याचा मुद्दा माझ्याकडे मांडला. त्यानुसार महापालिकेला हुडकोच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे, महिनाभरात ही रक्कम मिळून जाईल, त्यामुळे महापालिकेची चिंता आता मिटली आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पाणी पुरवठा योजनेचे काम रखडल्याच्या कारणावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरूनच कंत्राटदाराला काम कधी पूर्ण होईल, अशी विचारणा केली. 26 एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रामुळे शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी कमी होणार असले तरी मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविल्यामुळे आता ऑक्टोबर ऐवजी डिसेंबरमध्ये शहराला वाढीव 200 एमएलडी पाणी मिळणार आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून कंत्राटदाराला काम कधी करता, असा प्रश्‍न करत मार्च 2026 पर्यंत योजना पूर्ण करा, असे आदेश दिले.

पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संदीपन भुमरे, डॉ. भागवत कराड, डॉ. कल्याण काळे, आमदार प्रदीप जैस्वाल, सतीश चव्हाण, नारायण कुचे, अनुराधा चव्हाण, संजय केणेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, जीव्हीपीआरचे संचालक शिवा रेड्डी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT