Shiv Sena removed from alliance in Sambhajinagar ZP: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदावरून एकमत न झाल्याने भाजपने शेवटच्या क्षणी शिवसेनेला युतीतून बाहेरचा रस्ता दाखवला.
पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने आणि महाविकास आघाडीचे सदस्य फोडून भाजपने मोहीम फत्ते केली. अपक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 आणि काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपला साथ दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत 23 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. एका पुरस्कृत उमेदवारासह भाजपचे संख्याबळ 24 वर पोहोचले. तर शिवसेनेचे 22 सदस्य निवडून आले.
निकालानंतर महायुतीची निर्विवाद सत्ता स्थापन होणार असे चित्र असताना दोन-तीन दिवसांपासून अडीच अडीच वर्षाच्या अध्यक्षपदावरून आणि पहिल्या टर्ममध्ये अध्यक्ष कोणाचा यावरून स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र एकमत होऊ शकले नाही.
या संघर्षानंतर अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी आधीच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी गेम फिरवला. भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला सोडून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि अपक्षांना सोबत घेतले.
तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 आणि काँग्रेसचा 1 सदस्य फोडून थेट अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर दावा करत अर्ज दाखल केले. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या जिल्हा परिषदेत 36 सदस्य भाजपच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपने युतीतून बाहेरचा रस्ता दाखवताच शिवसेनेने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी केवळ भाजपकडूनच प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाला.
आता जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपदी वैजापूर तालुक्यातील महालगाव गटाचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी फुलंब्री तालुक्यातील बाबरा गटाचे जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ओबीसी निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय :
फुलंब्री तालुक्यातील बाबरा जिल्हा परिषद गटाचे जितेंद्र जयस्वाल मागील गेल्या काही वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ राहून कार्यरत आहे. आमदार अनुराधा चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून देखील जितेंद्र जयस्वाल यांची ओळख आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.