Youth Congress
Youth Congress Sarkarnama
मराठवाडा

युवक काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नेत्यांच्या मुलांमध्ये चुरस; मराठवाड्यातूनही दोघे इच्छूक

सयाजी शेळके

उस्मानाबादः युवक काँग्रेसच्या पक्षाअंतर्गत निवडणुकीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यासाठी मराठवाड्यासह राज्यभरातील तरुण पदाधिकारी कामाला लागले आहेत. मराठवाड्यातून दोघांनी या पदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर सांगली, पुणे, अहमदनगर या पश्चिम महाराष्ट्रातील युवक काॅंग्रेसचे पदाधिकारी देखील शर्यतीत उतरले आहेत. जिल्ह्यातून तगडे आवाहन मिळत आहे.

कोरोनामुळे पक्षांतर्गत निवडणुका देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु आता परिस्थिती पुर्वपदावर येत असल्याने काँग्रेस पक्षाच्या पक्षाअंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोना काळात कमी झालेला संपर्क, दुरावलेले कार्यकर्ते यांना पुन्हा साद घालण्याचे प्रयत्न युवक पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाले आहेत.

प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपल्याला समर्थन मिळावे यासाठी युवा नेत्यांची धावाधाव सुरू झाली असून अनेकांनी संपर्क दौरे देखील सुरू केले आहेत. युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी यंदाही मोठी चुरस असणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक शिवराज मोरे जे सध्या युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत, त्यांना आता अध्यक्षपद खुनावत आहे.

याशिवाय उर्जामंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांनीही दंड थोपटले आहेत, विदर्भातून त्यांना चांगला पाठिंबा मिळेल असे दिसते. प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत महिला नेत्या पण मागे नाहीत, विदर्भातून कल्याणी वडेट्टीवार यांनीही जोर लावला आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून अब्दुल अमेर सालीम यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.

त्यामुळे मावळते युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतात हे देखील महत्वाचे ठरणार आहे. पुण्यातून विजयसिंह चौधरी या पदासाठी इच्छूक असून त्यांना विश्वजीत कदम यांचा पाठिंबा महत्वाचा ठरणार आहे. अनिकेत म्हात्रे (मुंबई) हे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते.

प्रदेशाध्यक्ष पदासाठी एकूण १५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये अनिकेत म्हात्रे (मुंबई), मनोज कायंदे, प्रशांत ओगले, तन्वीर अहमद कुरेशी, आकाश गुजर, निखील कांबळे हे पुरुष उमेदवार असून रेखा पवार, सोनालक्ष्मी घाग, कल्याणी रांगोळे, शिवाणी वडेट्टीवार या महिला उमेदवारांचा देखील समावेश आहे. मराठवाड्यातून औरंगाबादचे अब्दुल अमेर सालीम यांची उमेदवारी आहे.

तर दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील शरण पाटील हेही प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपले भवितव्य अजमावत आहेत. काँग्रेस पक्षाचे विद्यमान कार्याध्यक्ष बसवराज पाटील याचे ते चिरंजीव आहेत. १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर निवडणुकीचा (मतदानाचाही) कार्यकाळ असणार आहे. तर प्रत्येक मतदान करणाऱ्या सदस्याने ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याला तात्काळ (ऑनलाईन) मतदान करता येणार आहे.

उस्मानाबाद युवक जिल्हाध्यक्ष कोण होणार?

जिल्हाध्यक्ष पदासाठी चंद्रशेखर पवार, श्रीनिवास पाटील, अवधूत क्षीरसागर, आण्णासाहेब महानोर, कन्हैया कडगंचे, रुपाली माटे यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे. जास्तीची मते मिळणाऱ्यास अध्यक्षपद, त्यापेक्षा कमी मिळालेल्याला उपाध्यक्ष अशी विभागणी केली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT