Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat News : शिरसाटांचा मोठा दावा; ठाकरेंची शिल्लक सेनाही लवकरच आमच्याकडे येईल

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना कोणाची याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वी दिला. शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्यातील शिवसेना नेत्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. आमदार तथा शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट (sanjy shirsat) यांनी ठाकरेंची शिल्लक सेना 30 जानेवारी पर्यंत आमच्याकडे येणार, असा दावा केला आहे.

आमदार अपात्रतेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि विधिमंडळ नियमांचे पालन करत दोन दिवसांपूर्वी निकाल दिला असा दावा केला जात आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले आमदार आणि पदाधिकारी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतील, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला.

जे रोज टीव्हीवर येऊन सरकार पडणार, मुख्यमंत्री घरी जाणार, असे बोलत होते. त्यांचे तोंड विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर बंद झाले आहे. या निकालानंतर ज्यांना आमच्याकडे यायचं आहे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. त्यामुळे लवकरच ते शिवसेनेत येतील, 30 जानेवारीपर्यंत सर्व पक्षप्रवेश होतील, असेही शिरसाट म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath shinde) यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत बापजादे काढणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासारखी भाषा वापरू नये, त्यांना ती शोभत नाही, असा सल्लाही शिरसाट यांनी दिला. कारण मुख्यमंत्र्यांवर घराणेशाहीचा आरोप करताना आपणही बाळासाहेबांच्या कृपेने राजकारण करत आहात, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे तुम्हाला शोभत नाही. ज्या मोदींनी देशाच्या स्वाभिमानाचा झेंडा जगात लावला त्यांच्यावर टीका करण्याने ठाकरे यांची प्रतिमा खराब होत आहे. संजय राऊत यांनी टीका करणे समजू शकतो, पण उद्धव ठाकरे यांना हे बरे दिसत नाही, असेही शिरसाट म्हणाले.

(Edited By Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT