कॉक्रोच जनता पार्टी (CJP) राजकारणात उतरणार का, याबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. CJPचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, या बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीचा रोडमॅप निश्चित केला जाणार आहे. संभाजीनगर येथे दीपके यांच्या निवासस्थानी सुरू झालेल्या या बैठकीत CJPच्या कोअर कमिटीतील सदस्य सहभागी झाले आहेत. सौरभ दास यांच्यासह संघटनेचे अनेक सहकारीही बैठकीसाठी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा, ध्येय-धोरणे आणि संघटनेची भूमिका निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राजकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि निवडणूक आयोग यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या अविश्वासावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी अभिजीत दीपके म्हणाले, "सध्या देशातील राजकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि निवडणूक आयोग यांसारख्या प्रमुख संस्थांवरील जनतेचा विश्वास पूर्णपणे उडालेला दिसत आहे. आम्ही सुरू केलेल्या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा फक्त शिक्षण क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नाही.
जसजसे हे आंदोलन पुढे गेले, तसतसे या सर्व संस्थांवरून विश्वास कमी झाल्यामुळे निर्माण झालेला जनतेचा राग जंतरमंतर, मुंबई, बंगाल आणि चेन्नईसह संपूर्ण देशभरात उघडपणे दिसून आला. त्यामुळे या सर्व संस्थांमध्ये उत्तरदायित्व आणि तटस्थता पुन्हा आणण्यासाठी एका मोठ्या जनआंदोलनाची आणि जनदबावाची नितांत गरज आहे."
देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवरही त्यांनी भाष्य केले. "आज देशातील राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सकाळी नागरिक ज्या प्रतिनिधीला निवडून देतात, संध्याकाळी दुसऱ्याच पक्षाचे सरकार स्थापन होते. आमदार किंवा खासदार एका पक्षातून निवडून येतात आणि संध्याकाळपर्यंत दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात.
जर तसे झाले नाही, तर ईडी आणि सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून राजकीय पक्ष फोडले जातात. या सर्व प्रकारांमुळे देशातील जनता अत्यंत त्रस्त झाली आहे. आमच्या जनआंदोलनाला लोकांनी कोणत्याही विचारसरणीचा किंवा राजकीय पक्षाचा विचार न करता एकत्र येऊन पाठिंबा दिला. देशात लोकशाही दुर्बल करणाऱ्या घटकांच्या विरोधात सर्व नागरिक एकवटले आहेत," असे त्यांनी सांगितले.
CJP राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर दीपके यांनी याबाबतही भूमिका स्पष्ट केली. "सध्या देशाला राजकीय पक्षापेक्षा एका मजबूत प्रेशर ग्रुपची म्हणजेच दबाव गटाची गरज आहे. सीजेपी हा एक राजकीय पक्ष म्हणून नाही, तर एक प्रभावी प्रेशर ग्रुप म्हणून काम करेल," असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील दोन दिवस चालणाऱ्या बैठकीत बेरोजगारी, आर्थिक संकट, लोकशाही संस्थांवरील विश्वास, माध्यमांची भूमिका, न्यायव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता अशा विविध विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. याशिवाय या प्रश्नांवर जनदबाव कसा निर्माण करायचा आणि पुढील आंदोलनाची रणनीती काय असावी, यावरही निर्णय घेतला जाणार आहे.
सोनम वांगचुक यांच्या भूमिकेबाबत बोलताना दीपके म्हणाले, "सोनम वांगचुक हे या आंदोलनात सुरुवातीपासूनच मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक म्हणून सोबत राहिले आहेत आणि भविष्यातही ते सीजेपीच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत राहतील. देशातील तरुणांच्या हक्कासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी हा दबाव गट सातत्याने प्रयत्न करत राहील."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.