Chhatrapati Sambhajinagar student protest; Abhijeet Dipke and Anna Hazare sarkarnama
मराठवाडा

Abhijeet Dipke : "यात म्हाताऱ्या लोकांचं काय काम?"; विद्यार्थी आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांचं अण्णा हजारेंवर वक्तव्य चर्चेत

Student Protest on TET Paper Leak : पेपर फुटीच्या प्रकरणानंतर कॉक्रोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले असून आज ते छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : पेपर फुटीच्या प्रकरणानंतर देशातील वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री हे कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे जीव गेले, त्याला तेच जबाबदार आहेत. यामुळे त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आमचे आंदोलन थांबणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेणारे कॉक्रोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी घेतली. पण आता आंदोलनादरम्यान त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिजीत दिपके यांना अण्णा हजारे यांच्याबद्दल काय वाटते? असा प्रश्न विचारला. तेव्हा ते चांगलेच संतापले. यावेळी त्यांनी, अण्णा हजारे यांचा या आंदोलनाशी काय संबंध? त्यांनी यात काय भूमिका घेतली? असा सवाल करत, हे आंदोलन आमचे, तरुणांचे आहे. ते आम्हालाच हाताळू द्या. हा देशभरातील कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. यात म्हाताऱ्या लोकांचे काय काम? त्यांनी आता आश्रमात जावे.

केवळ सामाजिक काम करणाऱ्या नेत्यांनीच नाही तर राजकारणातील वयस्कर नेत्यांनी आता थांबल पाहिजे आणि देशातील तरूणांना नेतृत्व करू दिले पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी दिपके यांनी केली. दरम्यान आता त्यांनी 'पॉलिटीक्स और सामाजिक कामो मे अब बुढ्ढे लोगो का क्या काम', असे विधान दिपके यांनी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दिल्लीच्या ज्या जंतरमंतर मैदानावर पेपरफुटीच्या प्रकरणावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे, त्याच जंतरमंतर मैदानातून काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांनी देशातील सत्ताधाऱ्यांना हादरवून टाकले होते.

सातत्याने देशात घडणारे पेपर फुटीचे प्रकार, त्यावरून नव्याने घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, युपीएससी, एमपीएससी परीक्षांमधील गोंधळ आणि यातून विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक ताण यावरून देशातील तरूण, विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. कॉक्रोज जनता पार्टीच्या माध्यमातून तो बोहर पडू लागला आहे. देशभरात विद्यार्थी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरूण सरकारला जाब विचारत आहे. अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून सुरू केलेल्या या मोहिमेला चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी मैदानात उतरलेल्या अभिजीत दापके यांनी अण्णा हजारे आणि त्यांच्या वयाच्या राजकारण्यांवर सडकून टीका करतांना चक्क त्यांचा उल्लेख म्हातारे, बुढ्ढे असा केला. शिवाय त्यांनी आता निवृत्त होऊन आश्रमात जाण्याचा सल्लाही दिला. दिपके यांच्या या विधानानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नीट, टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणानंतर राज्यातील विद्यार्थी व त्यांच्या संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. पेपर लीक, परीक्षा घोटाळे आणि शिक्षण व्यवस्थेतील गडबडींविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या वतीने दिल्लीतील जंतरमंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दीपके देशभरात करत आहेत. आज छत्रपती संभाजीनगर जिथे दिपके यांचे स्वतःचे घर आहे त्या शहरात विद्यार्थ्याचे मोठे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.

NEET, CUET, CBSE आणि SSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये कथित पेपर लीक आणि अनियमितता झाल्याच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. युपीएससी, एमपीएससी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरण आणि सातत्याने पेपर फुटीचे घडणारे प्रकार यामुळे संताप व्यक्त करत असल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT