CM Eknath Shinde Nanded News  Sarkarnama
मराठवाडा

Nanded Shivsena News : मुख्यमंत्र्यांसोबत ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सत्तार, बांगर, पाटील यांच्यात चढाओढ..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज `शासन आपल्या दारी`, कार्यक्रमानिमित्त नांदेडमध्ये होते. या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवण्यात आली होती. (CM Eknath Shinde Nanded News) हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थितीत होते. नांदेड जिल्ह्यात कार्यक्रम असला तरी हे दोघे उपस्थितीत होते, कारण हेमंत पाटील यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी पाहिजे आहे, तर बांगर यांना मंत्रीपद.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात हो दोन्ही लोकप्रतिनिधी त्यांच्या अवतीभवती वावरत होते. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावरच कार्यक्रमाची जबाबदारी असल्याने ते यजमानाच्या भूमिकेत होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसे असे भाषण केले. (Nanded) विरोधकांवर फार टीका करण्यात वेळ न घालवता त्यांनी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देत सरकार सर्वसामन्यांचे आहे, हे सांगितले.

दरम्यान, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप देखील (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले. या ट्रॅक्टरचे वाटप करतांना मुळचे शेतकरी असलेल्या मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर चालवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी ट्रॅक्टरवर चढत स्टेअरिंग हातात घेतले. लगोलग कृषीमंत्री अब्दुल सत्तार त्यांच्या बाजूला जावून बसले. हे पाहून खासदार हेमंत पाटील डाव्या बाजूला बसले.

मग आमदार संतोष बांगर तरी मागे कसे राहतील? त्यांनी ट्रॅक्टरमध्ये घुसखोरी करत सत्तारांच्या बाजूला मिळेल त्या जागेवर अवघडलेल्या अवस्थेत उभे राहणे पसंत केले. काही अतंरापर्यंत ट्रॅक्टर चालवत मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्याला चावी सुपूर्द केली. हिंगोली लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे, दावा सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी निवडूणकीची तयारी देखील सुरू केली आहे. दुसरीकडे शिंदे गट मात्र अजून शांतच आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांच्या जीवाची घालमेल वाढली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या जवळ जात हिंगोलीची जागा आणि माझी उमेदवारी पक्की करा, हे सांगण्याचा प्रयत्न तर त्यांनी केला नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. तर सध्या अनेक वादांमुळे अडचणीत सापडलेल्या सत्तारांवर मुख्यमंत्री नाराज आहेत. त्यांची नाराजी कमी व्हावी आणि कृपादृष्टी कायम राहावी या प्रयत्नात सत्तार दिसले. तर शंभर टक्के मी मंत्री होणार, असा दावा करणारे आमदार बांगर आपली काही डाळ शिजते का? याची चाचपणी करतांना दिसले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT