Amit Deshmukh
Amit Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh :काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा ; पटोलेंपाठोपाठ लातूरात देशमुखांचेही झळकले बॅनर!

Jagdish Pansare

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दणदणीत यश मिळवले. राज्यात 30 जागा जिंकत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीने महायुतीचे मिशन 45 फेल केले. मराठवाड्याने यात महत्वाची भूमिका बजावत आठ पैकी सात मतदारसंघात विजय मिळवला.

लोकसभेच्या लातूर मतदारसंघात माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजपाची हॅटट्रिक तर रोखलीच पण हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणला. शेजारच्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले, त्यातही लातूरच्या देशमुखांचा हातभार लागला. त्यानंतर आता अमित देशमुख यांच्याकडे त्यांचे समर्थक राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहू लागले आहेत.

लातूरात लागलेल्या एका बॅनरने सध्या लातूरकर यांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे लातूर नवनिर्वाचित खासदार डाॅ. शिवाजी काळगे यांच्या निवासस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य चौकातील हे बॅनर लक्षवेधी ठरत आहे. भावी मुख्यमंत्री अमित भैय्या देशमुख असा यात उल्लेख करण्यात आला आहे.

याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. लोकसभा निवडणुकीत विजयामुळे राज्यात काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. राज्यात सर्वाधिक खासदार निवडून आणत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. अर्थातच या यशाचे श्रेय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांना जाते.

त्यामुळे उत्साहाच्या भरात समर्थकांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जाणे सहाजिक आहे. असाच उत्साह लातूरमध्येही दिसून येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा चालवणारे अमित देशमुख यांनी मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड या दोन लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडला आम्ही कधी अंतर देणार नाही, असे सांगत इथे आता अशोकाची पतझड होऊन वसंत बहरणार, असा सूचक संदेश प्रचाराच्या वेळी दिला होता. नांदेडमध्ये अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर, महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी अशी भक्कम फौज असताना काँग्रेसने इथे भाजपला धूळ चारली.

नांदेडच्या विजयातही अमित देशमुख(Amit Shah) यांचा वाटा आहे. लातूरच्या होमपिचवर खरतर अमित देशमुख आणि त्यांच्या संपुर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काळगे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून अमित देशमुख, धीरज देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासह वैशाली देशमुख या सगळ्यांनी काळगे यांच्यासाठी सभा, मेळावे, बैठका घेत जोर लावला होता. काळगे यांच्या विजयाच्या रुपात त्याचे फळ मिळाले. आता अमित देशमुख यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मुख्यमंत्री म्हणून मिळावी, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगून आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT