Aurangabad East Assembly Constituency 2024. Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad East Assembly: औरंगाबाद पूर्वमध्ये काँग्रेसने चेहरा बदलला, निकाल बदलणार का?

Congress Changes Candidate in Aurangabad East: 2014 मध्ये शिवसेना-भाजप युती नसताना मतांचे विभाजन झाले तरी अतुल सावे यांनी बाजी मारली होती. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती होती त्यामुळे सावे यांचा दुसरा विजय प्रत्यक्षात उतरला.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात रविवारी मोठ्या घडामोडी घडल्या. काँग्रेसने एम. के. देशमुख यांना उमेदवारी देत खेळलेले मराठा कार्ड अवघ्या 48 तासात माघारी घेतले. देशमुख यांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती.

काँग्रेसने या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार द्यायला हवा होता, अशी मागणी करत गांधी भवनासमोर पदाधिकारी निदर्शने करत होते. या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या.

काँग्रेसने तडकाफडकी देशमुखांची उमेदवारी रद्द करत मल्हार सेनेचे लहू शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली. एम. के. देशमुख यांच्या माध्यमातून मराठा कार्ड खेळल्यानंतर (Congress) काँग्रेसने अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

48 तासात काँग्रेसने उमेदवार बदलला पण या बदलाने मतदार संघातील निकाल बदलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान मंत्री अतुल सावे हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत.

2014 मध्ये शिवसेना-भाजप युती नसताना मतांचे विभाजन झाले तरी अतुल सावे यांनी बाजी मारली होती. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती होती त्यामुळे सावे यांचा दुसरा विजय प्रत्यक्षात उतरला. भाजपने लोकसभा निवडणुकीनंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना मैदानात उतरवले.

मंत्री अतुल सावे यांनाही पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. सावे यांना पूर्व मधून हॅट्रिक साधायची आहे तर काँग्रेस, एमआयएम आणि वंचित आघाडी या तीन पक्षांनी त्यांना रोखायचे आहे. त्या दृष्टीने या तीनही पक्षांनी रणनीती आखली आहे.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत होणार हे आता निश्चित झाले आहे. (Atul Save) एमआयएम ने पक्षाचे कार्याध्यक्ष गफ्फार कादरी यांना बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतर अपेक्षेप्रमाणे माजी खासदार इम्तियाज जलील यांची उमेदवारी पूर्व मधून जाहीर झाली.

इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीचा जल्लोष सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी पूर्व मध्ये आधी जाहीर केलेल्या वंचितच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करत एमआयएमच्या आनंदावर पाणी फेरले.

मुस्लिम मतांचे विभाजन होऊन इम्तियाज जलील यांचा `करेक्ट कार्यक्रम` करण्याच्या हेतूने वंचित ने विकास दांडगे यांची उमेदवारी रद्द करत लोकसभेला एमआयएम विरुद्ध लढलेले अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केली.

तिकडे गफ्फार कादरी यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर थेट समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांची मुंबईत भेट घेऊन थेट पक्षाचा `एबी` फॉर्म मिळवला. त्यामुळे पूर्व विधानसभा मतदारसंघात आता तीन मुस्लिम उमेदवार असणार आहेत. याचा थेट फायदा महायुतीचे अतुल सावे यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

समाजवादी पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले गफार कादरी एमआयएम कडून या मतदार संघात 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुकीत लढले होते. त्यांनी भाजपच्या अतुल सावे यांना चांगली लढत दिली होती.

या दोन्ही निवडणुकीत एमआयएम चा थोडक्यात पराभव झाला. 2019 मध्ये हा मतदार संघ काँग्रेसने समाजवादी पक्षाला सोडला होता. कलीम कुरेशी हे सपाचे उमेदवार होते, त्यांना साडेपाच हजार मते मिळाली होती.

आता कदारी सपाकडून कशी कामगिरी करतात ? यावर पुर्व चा निकाल अवलंबून असणार आहे. पक्ष बदलला असला तरी पूर्व मतदार संघात गप्फार कादरी एमआयएम आणि वंचितच्या उमेदवाराला रोखण्याचे काम करू शकतात. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी, वंचित आणि एमआयएम अशी चौरंगी लढत होत असल्याने यावेळी निकाल काय लागतो? याकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT