Congress former MP Janardan Waghmare passes away Sarkarnama
मराठवाडा

Congress Leader : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार, माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

Congress former MP Janardan Waghmare passes away : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन झाले. त्यांच्या राजकीय आणि शैक्षणिक कार्याचा आढावा वाचा सविस्तर.

Rashmi Mane

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठवाडा आणि राज्यातील शैक्षणिक, साहित्यिक तसेच सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. मराठवाड्यात साहित्य, शिक्षण आणि समाजकारणाच्या क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

डॉ. जनार्दन वाघमारे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून बीए, पुणे विद्यापीठातून एमए, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी, एलएलबी आणि एलएलएम पदव्या संपादन केल्या. पुढे पंजाबी विद्यापीठ, पटियाला येथून डी.लिट ही उच्च पदवीही त्यांनी मिळवली. शिक्षणाची भक्कम पार्श्वभूमी आणि अभ्यासाची सखोलता यामुळे त्यांची ओळख एक विद्वान अभ्यासक म्हणून निर्माण झाली.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. वैचारिक लेख, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, आत्मचरित्रात्मक लेखन, व्यक्तिचित्रण, ललित लेखन आणि अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी योगदान दिले. त्यांच्या लेखनातून सामाजिक भान, प्रबोधनाची भूमिका आणि परिवर्तनाची जाणीव स्पष्ट दिसून येते.

शिक्षण क्षेत्र हा त्यांचा मूळ आवडीचा आणि कार्याचा विषय होता. अध्ययन आणि अध्यापन यालाच त्यांनी जीवनधर्म मानले. प्राध्यापक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर प्राचार्य आणि नंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे संस्थापक कुलगुरू म्हणून त्यांनी प्रशासनिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय उभारणीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी विशेष ओळख मिळवली. निग्रो साहित्यावर त्यांनी सखोल भाष्य केले होते. दलित आणि पुरोगामी साहित्य चळवळीचे ते अभ्यासक होते. सामाजिक समता, न्याय आणि प्रबोधन यासाठी त्यांनी सातत्याने लेखन आणि व्याख्याने दिली. शिक्षणासोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी संसदेत जनतेचे प्रश्न मांडले.

त्यांच्या निधनाने साहित्यविश्व, शैक्षणिक क्षेत्र आणि राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

SCROLL FOR NEXT