Congress, BJP News Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Congress News : नांदेड, धाराशिवमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ; भाजपचा दरारा वाढला

Political News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसमधील बड्या नेत्यांना गळ टाकणे सुरू केले आहे.

Shital Waghmare

Dharashiv News : गेली कित्येक दशके ज्या काँग्रेसने मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांवर वर्चस्व गाजवले, ते एकएक जिल्हे आता काँग्रेसमुक्तीकडे वाटचाल करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसमधील बड्या नेत्यांना गळ टाकणे सुरू केले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या धक्यातून काँग्रेस सावरत नाही तोच, माजी मंत्री बसवराज पाटील यांनीही मोदी गॅरंटीवर विश्वास दाखवत भाजपची वाट धरली.

मराठवाड्यातील या दोन नेत्यांच्या पक्ष सोडून जाण्याने नांदेड आणि धाराशिव हे दोन जिल्हे काँग्रेसमुक्तीकडे निघाले आहेत. कधीकाळी या जिल्ह्यांमध्ये भाजप शोधूनही सापडत नव्हती, तो पक्ष आज सर्वात शक्तीशाली झाला आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे एकहाती वर्चस्व होते, त्यामुळे तिथे काँग्रेसला भगदाड पडले आहे. तर धाराशिव जिल्ह्यात बसवराज पाटील यांच्याआधी म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे.

धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे भाजपच्या कमळाला संघटनात्मक पातळीवर वाढ करण्यास मर्यादा होत्या. तरीही रमण धोत्रीकर भाजपच्या चिन्हावर धाराशिव पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर एक दोन नगरसेवक कमळ चिन्हावर निवडून येत राहिले. परंतु स्वतंत्रपणे कमळ चिन्हाचा आणि भाजपचा प्रभाव म्हणता येईल, अशी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती. हे दोन्ही मातब्बर नेते भाजपकडे आल्यामुळे पूर्वी अशक्त असलेली भाजप आता सर्वात सशक्त झाली आहे.

त्या तुलनेने उद्धव ठाकरेचा शिवसेना गट वगळता बाकीच्या सर्व पक्षांची अवस्था बिकट झाली आहे. धाराशिव म्हणजे यापूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव पुसून टाकण्यात काँग्रेसला यश आले. जिल्ह्यातील भाई उद्धवराव पाटील यांच्यानंतर शेकाप हळूहळू कमकुवत झाली आणि काँग्रेसने बाळसे धरायला सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीतही त्याचा चांगलाच प्रभाव जाणवू लागला.

त्यानंतर आघाडी व युतीच्या राजकारणामध्ये हा धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीमुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. तत्पुर्वी धाराशिव जिल्ह्यातील राणाजगजीतसिंह पाटील आणि आता काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजप जिल्ह्यात बाहुबली ठरत आहे. एकेकाळी धाराशिव जिल्ह्यात भाजपची राजकीय परिस्थिती बिकट होती. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि भाजपाचे कमळ हातात घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील एक मोठा गट भाजपात दाखल झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपला डबल इंजिनची ताकद..

देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे मानसपुत्र, काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी मंगळवारी भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश केला. त्यामुळे प्रामुख्याने धाराशिव व लातूरमध्ये काँग्रेस पक्ष खिळखिळा होणार आहे. बसवराज पाटील यांच्या भाजप (Bjp) प्रवेशामुळे त्यांच्यासोबत असणारे अनेक आजी-माजी पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, बाजार समित्याचे संचालक हे भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते.

बसवराज पाटील यांचे साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, उमरगा जनता सहकारी बँक, त्याचबरोबर अनेक संस्थांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव आहे. ते औसा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. 2009 आणि 2014 अशा दोन निवडणुकांमध्ये त्यांनी तिथून विजय मिळवला होता. काँग्रेसने त्यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्रीपद दिले होते. मात्र, 2019 मध्ये भाजपच्या अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी त्यांचा पराभव केला.

माजी आमदार बसवराज पाटील (Baswraj Patil) यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील भाजपला मोठे बळ मिळाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा निवडणुकीवर याचा थेट परिणाम होणार आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे, शरद पवार गटाला तर याचा फटका बसणार आहेच. पण महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे.

(Edited By - Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT