Vijay Wadettiwar, Chhagan bhujbal Sarkarnama
मराठवाडा

Vijay Wadettiwar : " येणार...येणार म्हणाले, पण आलेच नाही, ओबीसी मेळाव्याला वडेट्टीवारांनी का मारली ऐनवेळी दांडी ?

Deepak Kulkarni

Hinogoli News : मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच रान पेटलं आहे. दोन्ही समाजाचे नेते रस्त्यावर उतरले असून, वाद दिवसागणिक मिटण्याऐवजी पेटतच चालला आहे.

तसेच जरांगे पाटलांच्या जाहीर सभांना आता ओबीसी मेळाव्याने प्रत्युत्तर देण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यातच एकीकडे भुजबळ विरुद्ध जरांगे असा संघर्ष पेटला असतानाच दुसरीकडे भुजबळ आणि वडेट्टीवार या ओबीसी नेत्यांमध्येही खटके उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी यापुढे आपण भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते, पण त्यांनी आपल्या वक्तव्यावरून काही तासांतच यू टर्न घेत हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते, पण त्यानंतर मेळाव्याला ते हजेरी लावणार का अशी चर्चा असतानाच त्यांनी ऐनवेळी भुजबळ उपस्थितीत झालेल्या हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला दांडी मारली. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

हिंगोली येथे ओबीसी समाजाची एल्गार सभा रविवारी पार पडली. या सभेत आरोप-प्रत्यारोपांच्या तोफ ओबीसी नेत्यांकडून डागण्यात आल्या. भुजबळांच्या निशाण्यावर प्रामुख्याने मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील राहिले. शिवाय ओबीसी नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेवरूनही त्यांनी टीकेची झोड उठवली.

जालन्यातील ओबीसी समाजाच्या पहिल्या मेळाव्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भूमिकेत बदल करताना छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) यांच्या वक्तव्याशी सहमत नसून, यापुढे त्यांच्या सभेत उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते, परंतु शनिवारी त्यांनी आपल्या भूमिकेवरून यू टर्न घेत या सभेला जाणार असल्याचे म्हटले होते, पण वडेट्टीवार रविवारी सकाळीच अचानक हैदराबादला रवाना झाल्याने ते ओबीसी समाजाच्या सभेत सहभागी होणार की नाही, याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वडेट्टीवार काय म्हणाले होते...?

हिंगोली येथील ओबीसी बांधवांनी जोरदार तयारी केली होती, तर गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, ओबीसी नेत्यांचीसुद्धा अशीच भावना आहे. त्यामुळे आपण हिंगोलीच्या मेळाव्याला जाणार आहे. हा मेळावा सर्वपक्षीय मेळावा आहे. ओबीसींच्या हक्कासाठी मतभेद नको असं म्हणणारे नेते मला भेटले आहे. त्यामुळे आमच्या भूमिकेमुळे चुकीचा संदेश जाऊ नये आणि ओबीसींच्या आग्रहाखातर मी हिंगोलीच्या मेळाव्याला जातोय," असे वडेट्टीवार म्हणाले होते.

मराठा समाजाबाबतची मंत्री छगन भुजबळांची वक्तव्यं दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली होती. दरम्यान, आता वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली असून, उद्या होणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी सभेला (OBC Melava ) भुजबळांसोबत हजेरी लावणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

भाजपच्या देशमुखांचा वडेट्टीवारांवर निशाणा...

भाजप नेते आशिष देशमुखांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या यू टर्नवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, त्यांनी जालन्यातील मेळाव्यात ओबीसींबद्दलची आपली भूमिका मांडली होती. या सभेला पक्षाच्या वतीने मी देखील उपस्थित होतो. मात्र, दोन दिवस उलटत नाही तो वडेट्टीवार यांनी यावरून यू टर्न घेतला. त्यामुळे त्यांची ओबीसींबद्दलची भूमिका संशयास्पद आहे.

वडेट्टीवार नेहमी संभ्रम अवस्थेत आपल्या भूमिका मांडत असतात. या महाराष्ट्राला विरोधी पक्षनेत्याची एक मोठी परंपरा आहे, पण आजपर्यंतच्या इतिहासात वडेट्टीवार यांच्यासारखा संभ्रम अवस्थेत असणारा आणि यू टर्न घेणारा विरोधी पक्षनेता या महाराष्ट्राने पाहिला नसल्याची बोचरी टीका त्यांनी या वेळी केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT