Congress Leader Rajesaheb Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Beed Political News : मातब्बर मुंडेंच्या परळीतून काँग्रेसचे राजेसाहेब प्रयत्नशिल

Datta Deshmukh

Beed Congress Political News : जुना रेणापूर आणि आताच्या परळी विधानसभा मतदार संघाचा राजकीय इतिहास रंजक आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची राजकीय वाटचाल सुरु झालेल्या या मतदार संघाचे त्यांनी पाच वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या पंकजा मुंडे यांनीही दोन वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनाही धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

आता राष्ट्रवादीचे मातब्बर नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणुक फडात उतरण्यासाठी काँगेसचे राजेसाहेब देशमुख प्रयत्नशिल आहेत. (Beed) राजेसाहेब देशमुख कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती म्हणूनही काम केलेले आहे. कॉंग्रेसच्या राज्यसभा सदस्या रजनी पाटील यांचे विश्‍वासू अशी त्यांची ओळख आहे. हा मतदार संघ पुर्वी आघाडीत कॉंग्रेसला होता.

जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणाऱ्या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनाही या मतदार संघातून रघूनाथराव मुंडे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. परंतु, त्यानंतर मतदार संघावर त्यांनी आपली पकड कायम ठेवली. मुंडेमुळे राज्यात आणि देशात परळी मतदार संघाला राजकीय वलय आहे. 2009 साली दिवंगत मुंडे यांनी ्रपथम लाेकसभा निवडणुक लढविली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला असा मुंडे कुटूंबियांत पेच निर्माण झाला.

पंकजा मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि त्या विजयी झाल्या. तर, धनंजय मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. त्यानंतर 2012 सालच्या नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर धनंजय मुंडे यांनी आपले समर्थक दिपक देशमुख यांना नगराध्यक्ष करत भाजप उमेदवाराचा पराभव घडविला. (Congress) तेव्हापासून मुंडे कुटूंबात काका - पुतण्या अंक सुरु झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळाले.

दरम्यान, कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी पाच मतदार संघ राष्ट्रवादीकडे तर केवळ परळी मतदार संघ कॉंग्रेसकडे असायचा. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्यासाठी राष्ट्रवादीने ही एकमेव जागाही कॉंग्रेसकडून आपल्या पदरात पाडून घेतली. तत्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांची लढत राज्यभर गाजली. या निवडणुकीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या.

दरम्यान, मागच्या वर्षी राज्यातले राजकीय समिकरणे बदलली आणि जिल्ह्यातील प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्षच महायुतीत एकत्र आले. त्यामुळे परळीची जागा नेमकी पंकजा मुंडेंसाठी भाजपला कि धनंजय मुंडेंसाठी राष्ट्रवादीला असा पेच होता. मात्र, पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी आणि त्या पराभवानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड झाल्याने परळीतून मुंडेंमधून धनंजय मुंडेच उमेदवार असणार हे निश्‍चित झाले आहे.

आता लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी विजय मिळविल्याने जिल्ह्यात आघाडीला राजकीय चैतन्य आले आहे. परळीतून सोनवणेंच्या प्रचारात राजेसाहेब देशमुख आघाडीवर होते. जुनी कॉंग्रेसची जागा असल्याने आता पुन्हा रजनी पाटील यांच्या माध्यमातून ही जागा पक्षाला सोडवून घेण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत. शरद पवार आणि पाटील यांच्यातील ऋणानुबंधाचा फायदा होईल, असे देशमुख यांचे गणित आहे.

विलासराव देशमुख, विजयहसींह माोहीते यांच्यासाोबत ही काम करणारे देशमुख यांनी राष्ट्रवादी काॅँग्रेस युवक अआघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात देखील ते अग्रेसर आहेत. दरम्यान, धनंजय मुंडेंसारख्या मातब्बर नेत्याशी टक्कर देण्यासाठी कोण ? याबाबत खुद्द पवार देखील चाचपणी करत आहे.

परळीतून देशमुखांसह राष्ट्रवादीकडून बबन गित्ते, फुलचंद कराड, सुदामती गुट्टे, राजाभऊ फड आदी देखील पवारांकडे फिल्डींग लाऊन आहेत. आता पक्षाला जागा सोडवून घ्यायची आणि धनंजय मुंडे यांच्याशी दोन हात करायचे असे दुहेरी कष्ट देशमुखांपुढे आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता एकत्र झालेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT