Aurangabad | Mahavikas Aaghadi | Shivsena
Aurangabad | Mahavikas Aaghadi | Shivsena Sarkarnama
मराठवाडा

औरंगाबादमध्ये शिवसेनेने फोडले काँग्रेसचे घर; 'मविआ'तील पक्षांकडूनच एकमेकांना सुरुंग

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यात सध्या महाविकास आघाडीतील पक्षच एकमेकांना सुरुंग लावत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आधी मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसच्या (Congrees) सर्व नगरसेवकांना फोडले. त्यानंतर याचे उट्टे काढत काँग्रेसने परभणीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात ओढले. आता पुन्हा महाविकास आघाडीमधील शिवसेनेने (Shivsena) औरंगाबादमध्ये (Aurangabad) काँग्रेसचे घर फोडले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेत्यांसह १६ पैकी ७ सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

औरंगाबाद महापालिकेची मुदत येत्या २० मार्च रोजी संपणार आहे. सध्या तरी निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली असली तरीही त्यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहेत. याच वाऱ्यात २०१७ मध्ये काँग्रेसमधून निवडूण आलेल्या १६ पैकी ७ सदस्यांनी काँग्रेसला राम-राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या गटनेत्यांनीही मुंबईत जाऊन मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या इतर सदस्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यात शिवसेनेला यश येते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

सत्तारांपासून झाली सुरुवात :

२०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २३ जागा जिंकत जिल्हा परिषदेची सत्ता काबिज करण्याचा दावा केला होता. मात्र तेव्हाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या मदतीने भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यात यश मिळवलं. यात पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्ष आणि सभापती पद काँग्रेसकडे असे वाटून घेतले. पुढच्या अडीच वर्षांसाठी हे सुत्र बदलणार होते. यानुसार काँग्रेसकडे अध्यक्षपद येणार होते. मात्र ऐनवेळी अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पुढील अडीच वर्ष अध्यक्षपद घेण्यासाठी काँग्रेसला अनेक प्रयत्न करावे लागले होते.

काँग्रेसमधून आता शिवसेनेत कोण कोण गेले?

काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्यांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात त्यांचे मित्र आणि काँग्रेसचे माजी गटनेते श्रीराम महाजन, किशोर बलांडे, केशवराव तायडे, सीमा गव्हाणे, मीना गायकवाड, गोपीचंद जाधव, धनराज बेडवाल या जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतील एवढे सदस्य एकाच वेळी शिवसेनेत गेल्याने काँग्रेसला काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT