Amit Deshmukh-Basavaraj Patil Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Lok Sabha Election : शिवसेना, राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; अमित देशमुखांनी उमेदवारही ठरवला

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीतील शिवसेनेचा खासदार सध्या या मतदारसंघातून निवडून आलेला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Dharashiv News : अजित पवार यांच्या एंट्रीनंतर युतीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा असताना महाविकास आघाडीतही सर्वकाही आलबेल आहे, असे दिसून येत नाही. कारण, महाआघाडीतील तीनही पक्षांकडून एकमेकांच्या जागेवर दावा करण्यात येत आहे. आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघावर आता काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी दावा सांगितला आहे. तसेच, त्यांनी माजी मंत्री बसवराज पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशीही अपेक्षा व्यक्त करत तसा ठराव पक्षाकडे पाठविला आहे. (Congress's Amit Deshmukh's claim on Dharashiv Lok Sabha constituency)

काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने पक्षाने मतदारसंघनिहाय पक्षनिरीक्षक नेमले आहेत. त्यांच्याकडून मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. माजी मंत्री अमित देशमुख यांच्याकडे धाराशिव मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत बसवराज पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी आणि काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.

वास्तविक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत धाराशिव लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे होती. मात्र, आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने काँग्रेसकडून या मतदारसंघावर दावा करण्यात येत आहे. त्याला राष्ट्रवादीकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल. तसेच, महाविकास आघाडीतील शिवसेनेचा खासदार सध्या या मतदारसंघातून निवडून आलेला आहे. प्रभारी अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या धारशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या उमेदवारीचा ठराव करून तो प्रदेशला पाठविण्यात आला आहे.

धाराशिव लोकसभेबाबत काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमधून निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष आहे.

मी पक्षनिरीक्षक म्हणून धाराशिव लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली आहे. त्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते आणि इतर पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यातील बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री बसवराज पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केलेली आहे. कार्यकर्त्यांची मागणी पक्षाच्या हायकमांडकडे पाठविण्यात येईल. उमेदवारी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असेही माजी मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT