Marathwada Drought : मराठवाड्याला दुष्काळामुक्त करण्याच्या घोषणा आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सगळ्याच सरकारांनी केल्या. पण दुष्काळातून मराठवाडा काही मुक्त झाला नाही. सध्या राज्यासह मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी पाहणी करण्यासाठी आलेले राज्यपाल जिष्णू देव मिश्रा यांच्याकडे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक मागणी केली. अहमदपूर-चाकूर हा आपला विधानसभा मतदारसंघ दुष्कामुक्त करण्यासाठी झरी साठवण तलाव उपसा सिंचन योजनेला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याची मागणी बाबासाहेब पाटील यांनी थेट राज्यपालांकडेच केली.
अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या संकटातून कायमस्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी झरी साठवण तलाव उपसा सिंचन योजना मार्गी लागणे गरजेचे असल्याचंही सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं.
दुष्काळप्रवण भागातील शेतीला शाश्वत पाण्याची उपलब्धता निर्माण करून शेतकऱ्यांना दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या योजनेच्या प्रस्तावाबाबत जलसंपदा विभागाच्या स्तरावर आवश्यक तांत्रिक छाननी करण्यात आली आहे.
तसेच योजनेच्या खर्चात कपात, सिंचन क्षेत्रात वाढ आणि आवश्यक पूरक तरतुदींचा समावेश करून सुधारित प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्यात आला आहे. अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वत उपलब्धता करून देणे, हेच या प्रयत्नांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे झरी साठवण तलाव उपसा सिंचन योजनेला विशेष बाब म्हणून मंजुरी देऊन या भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती राज्यपालांकडे केल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगीतले.
दरम्यान, लातूर जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी चाकूर तालुक्यातील नायगाव येथे भेट देऊन पानंद रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतीपर्यंत शेतकऱ्यांना पोहोचण्यासाठी असलेल्या रस्त्यांची सद्यस्थिती आणि स्थानिक अडचणींची माहिती घेतली. त्यानंतर नायगाव येथील नेहरू विद्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतीसमोरील आव्हाने, दुष्काळी परिस्थिती, पाणी उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.
या दौऱ्यादरम्यान राज्यपालांच्या हस्ते मातोश्री पानंद रस्त्याच्या २० लक्ष रुपयांच्या कामाचे उद्घाटन तसेच महत्त्वाकांक्षी जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. चारा लागवडीसाठी लाभार्थ्यांना बियाण्यांचे वाटप, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले.
तसेच कृषी विभागाच्या वतीने पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, सावकारी जाचातून मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा उतारा, सातबारा प्रमाणपत्र आणि ताबा पावतीचे वाटपही करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.