BJP News : धाराशीवच्या भाजपा जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांना पक्षाने दुसऱ्यांदा संधी दिली. माजी आमदार सुरजितसिंह ठाकूर यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेल्या दत्ता कुलकर्णी यांच्या नियुक्तीतून ठाकूर यांनीही पुन्हा आपली सक्रीयता दाखवून दिली आहे. उद्योजक आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या दत्ता कुलकर्णी यांच्या नियुक्तीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा निष्ठावंतांनाच संधी देणार याचे संकेत देण्यात आले आहेत.
दत्ता कुलकर्णी यांनी यापुर्वी 2016 ते 2018 दरम्यान जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. यावेळी अनेकजण इच्छक असताना बंद लिफाफ्यात मात्र कुलकर्णी यांनीच आघाडी घेतल्याचे त्यांच्या नियुक्तीवरून दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी असलेली जवळीक आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा भक्कम पाठिंबा या जोरावर कुलकर्णी यांनी बाजी मारल्याचे बोलले जाते.
कुलकर्णी यांनी यापूर्वी जिल्हाध्यक्षपदाच्या काळात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे बोलले जाते. (Dharashiv) त्यांच्या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये पक्षाला मोठा फायदाही झाला होता. युवकांशी असलेला संपर्क, इतर पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध पाहता पक्षाने पुन्हा एकदा कुलकर्णी यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
दत्ता कुलकर्णी हे मुळचे उद्योजक, पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातही ते अग्रेसर आहेत. गुळ पावडर उद्योग उभारून अनेक तरुणांना त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय अनुभवाचा, जनसंपर्काचा पक्षाला मोठा फायदा होईल, हे देखील त्यांच्या निवडीमागील महत्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. या निवडीबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दत्ता कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आहे.
निष्ठावंत कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष
कुलकर्णी यांची राजकीय सुरवात भाजपचा कार्यकर्ता म्हणून झाली. त्यानंतर शहर सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली. बुद्धीजीवीप्रकोष्ठ भाजपाचे महाराष्ट्र, सहकार आघाडीचे राज्य संयोजक म्हणूनही ते कार्यरत होते. दरम्यान, भाजपचे माजी आमदार तसेच तत्कालीन प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. ठाकूर यांच्या माध्यमातूनच कुलकर्णी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरीबांसाठी राबविलेल्या योजना, हाती घेतलेले सामाजिक काम सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचे काम करू. पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दत्ता कुलकर्णी यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.