Minister Abdul Sattar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : सत्तारांचा आवाज टाईट, का त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पीएला टाईट मारली ?

मनाविरुद्ध झालेले निर्णय सत्तारांच्या पचनी कधीच पडत नाही, मग त्यानंतर टाईट होणे हीच त्यांच्या कामाची स्टाईल. (Minister Abdul Sattar)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वर्षावर काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सचिवाला शिवीगाळ केल्याच्या चर्चेला उधाण आले. राज्यात खरी शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा? याचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला. यावरून उद्धवसेना व शिंदेसेनेमध्ये महाभारत सुरू आहे. (Marathwada) ते सुरू असतांनाच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देखील महाभारत घडल्याची चर्चा माध्यमांमध्ये होती.

त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले ४० आमदार आणि शिंदे गटात देखील सगळेच काही अलबेल नाही अशी चर्चा सुरू झाली. त्यावर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज माध्यमांसमोर असे काही घडलेच नाही, असा दावा केला. माझा आवाज जरा टाईट आहे, त्यामुळे कदाचित असे वाटले असेल? अशी सारवासारव करतांना सत्तार दिसले.

मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव खतगांवकर यांना सत्तारांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार बाहेर आलाच कसा? यावर देखील शिंदे गटात खल सुरू आहे. असे असतांना सत्तारांनी माझा आवाज टाईट आहे, असे सांगत झाल्या प्रकाराचे लंगडे समर्थन केले आहे. आता सत्तारांचा खरंच आवाज टाईट आहे? की मग त्यांनी खतगांवकरांना टाईट मारली? हे तेच सांगू शकतील. एकंदरित अब्दुल सत्तार यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

काॅंग्रेस, शिवसेना आणि शिंदेगट असा राजकीय प्रवास करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार मुळात महत्वाकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात. नावात सत्ता असल्यामुळे ती आपल्याच हाती असली पाहिजे, असा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. मग ती मतदारसंघातील असो की, राज्याच्या राजकारणातील. काॅंग्रेस-आघाडीच्या सत्तेत मंत्री राहिलेले सत्तार, ठाकरेंच्या सरकारमध्ये देखील राज्यमंत्री होते.

शिंदेंच्या बंडात सहभागी झाल्यानंतर त्यांना पुन्हा प्रमोश मिळाले आणि ते राज्याचे कृषीमंत्री झाले. मनाविरुद्ध झालेले निर्णय सत्तारांच्या पचनी कधीच पडत नाही, हीच त्यांच्या कामाची स्टाईल. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळातून डिच्चू मिळणार हे लक्षात आल्यानंतर रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नंदनवन बंगल्यावर शिरसाट आणि सत्तार यांच्यात घडलेला प्रकार म्हणजेच सत्तारांची स्टाईल. तिथे देखील त्यांचा आवाज टाईट झाला होता, असे बोलले जाते.

काॅंग्रेसमध्ये मंत्री असतांना शासकीय विश्रामगृहात स्थानिक निवडणुकीची उमेदवारी मागण्यासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्याला त्यांनी लाथा-बुक्यांनी तुडवले होते, हा प्रसंग देखील या निमित्ताने आठवतो. पण ती देखील सत्तारांची स्टाईलच होती असे म्हणावे लागेल.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या पीएला सत्तारांनी शिवीगाळ केल्याच्या प्रकारावर शिंदे गटातील इतर मंत्री किंवा आमदार, खासदारांनी चक्कार शब्द काढलेला नाही. पण ही चर्चा बाहेर आल्याने शिंदे गटाची बदनामी झाली हे लक्षात आल्यानंतर सत्तारांना या संदर्भात खुलासा करावा लागला. आवाज टाईट असलेल्या सत्तारांनी खरचं मुख्यमंत्र्यांच्या पीएला टाईट मारली का? असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT