औरंगाबाद : शिवसेनेचे निवडणुक चिन्ह आणि नाव गोठवण्यात आल्यानंतर राज्यात उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष अधिकच भडकला आहे. एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे काही केल्या थांबत नाहीयेत. औरंगाबादेत शिंदे गटाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना टार्गेट केल्याचे दिसते. एकीकडे खैरे संपले, ते मातोश्रीवर वजन वाढवण्यासाठी बडबड करतात असा आरोप, तर दुसरीकडे खैरेंच्याच विरोधात आघाडी उघडत शिंदेसेना त्यांचे महत्व वाढवत आहे.
धनुष्यबाण आणि शिवसेनेचे नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचे पाप ५० गद्दार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. (Shivsena) एवढेच नाही तर आज स्व. आनंद दिघे असते तर त्यांना उलटे लटकवले असते, असा हल्ला देखील चढवला.
शिंदे गटाला खैरेंची ही टीका झोंबली आणि त्यांनी पोलिसा आयुक्तालय गाठत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे आघाडीवर होते. पोलिस आयुक्तांनी सातारा पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले आणि रात्री खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ५० खोके, एकदम ओक्के, गद्दार, दाढीवाला अशा शब्दात यापुर्वी देखील खैरेंनी शिंदेवर निशाणा साधला होता.
रिक्षावाल्याकडे एवढी संपत्ती आली कुठून असा सवाल करत खैरेंनी शिंदे गटाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. पण काल केलेल्या टीकेने म्हणा, की शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवल्यामुळे शिंदेगटाचा आत्मविश्वास वाढला. यातूनच खैरेंविरोधात तक्रार आणि त्याचे रुपांतर गुन्ह्यात झाले. राजेंद्र जंजाळ शिवसेनेत असतांना युवासेनेतील नियुक्त्या आणि खैरेंचे चिरंजीव ऋषीकेश खैरे यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईमुळे जंजाळ आणि खैरे यांच्यात अनेकदा खटके उडालेले आहेत.
खैरेंनी हातपाय तोडण्याची धमकी दिली तेव्हा जंजाळ खैरेंच्या थेट घरी पोहचले होते आणि तोडा माझे हातपाय असे आव्हान देवून आले होते. पुढे हा वाद मिटला आणि जंजाळांनी खैरेंशी जुळवून घेतले. पण ते मनापासून नव्हतेच. त्यामुळे आता मिळालेल्या संधीचा जंजाळ पुरेपूर फायदा उचलत असल्याची चर्चा आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील खैरेंना अटक झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
शिंदेसेनेचे दुसरे आमदार संजय शिरसाट हे खैरेंना सायको, पागल, मुर्ख ठरवत आहेत, तर पालकमंत्री भुमरे यांनी देखील खैरे विषय आता संपला, असे सांगत आहेत. दोनवेळा आमदार, राज्यात मंत्री आणि जिल्ह्याचे सलग चारवेळा खासदार राहिलेले खैरे यांचे महत्व त्यांच्यावर होणाऱ्या टीकेतून अधोरेखित होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यामागची कारण शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना देखील चांगलीच माहित आहे.
त्यामुळे खैरेंना टार्गेट करून त्यांची शक्ती क्षीण करण्याचा शिंदे गटाचा हा प्रयत्न असू शकतो. आगामी जिल्हा परिषद, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थासह २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता संपलेल्या खैरेंचे महत्व शिवसेनेत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात ते डोईजड होऊ शकतात हे लक्षात आल्यामुळेच शिंदे गटाने खैरेंना टार्गेट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.