Phulambri assembly constituency : फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या सावंगी परिसरातील तब्बल ४५ एकर जमिनीच्या विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारखान्याची ही जमीन अवघ्या ७ कोटी ४१ लाख रुपयांत विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, बाजारमूल्याच्या तुलनेत अत्यल्प दरात जमीन विकली गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
जमीन विक्री व्यवहाराची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, असा ठराव सर्वानुमते सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या 28 वी सर्वसाधारण सभा सोमवारी देवगिरी कारखान्याचे अध्यक्ष कल्याण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास शिरसाट, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कारखान्याचे चेअरमन कल्याण चव्हाण, संचालक नितीन देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, काँग्रेसचे नेते जगन्नाथ काळे, उपाध्यक्ष संदीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य निखिल चव्हाण, तालुकाध्यक्ष संतोष मेटे, मंडळ अध्यक्ष सुचित बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेत कारखान्यावरचा आजपर्यंतचा लेखाजोखा यावेळी सादर करण्यात आला. सावंगी परिसरातील कारखान्याच्या मालकीची ४५ एकर जमीन ७ कोटी ४१ लाख रुपयांत विक्री करण्यात आली. संबंधित जमिनीची किंमत सुमारे १०० कोटी रुपये असणे अपेक्षित असताना ती मोठ्या प्रमाणात कमी किमतीत विकण्यात आल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला.
व्यवहारामध्ये नेमकी प्रक्रिया काय झाली, जमिनीची किंमत कशी निश्चित करण्यात आली, विक्रीसाठी कोणाची परवानगी घेण्यात आली आणि कारखान्याला प्रत्यक्षात किती रक्कम प्राप्त झाली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जमीन विक्रीच्या काळातील तत्कालीन अवसायक रशीद शेख यांची भूमिकाही तपासण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
रशीद शेख हे सध्या सेवानिवृत्त झाले असले तरी संबंधित व्यवहारात काही आर्थिक नुकसान झाले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्यांच्याकडून नियमानुसार रक्कम वसूल करण्यात यावी, अशी भूमिका मांडण्यात आली.तसेच यावेळी नवीन सभासद नोंदणी करणे, मयत सभासदाची वारस नोंद घेणे, एम एस सी बँकेवर चोरी गेलेल्या वस्तूची जबाबदारी निश्चित करणे, जमीन विक्रीतील झालेल्या गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी करावी, जुन्या कामगारांना कारखान्यात संधी द्यावी, यासह आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कारखाना सुरू करणारच
कारखान्यातून मोठ्या प्रमाणात मशिनरी व वस्तूची चोरी झालेली आहे. त्यामुळे हे सगळं पुन्हा उभं करताना थोडा उशीर होत आहे. त्यामुळे बँकेचे कर्ज देखील मिळते का? याची पडताळणी आम्ही करीत आहे. आम्ही पाठपुरावा करून बँकेकडून कर्ज घेऊन लवकरच हा कारखाना सुरू होईल. आम्ही दिलेला शब्द पाळणार आहोत, असे आश्वासन आमदार अनुराधा चव्हाण यांनी यावेळी दिले.
देवगिरी साखर कारखाना एमएससी बँकेकडे गहाण होता. कारखाना सोडवून घेण्यासाठी आपण बँकेला ३६ कोटी रुपये दिले. मात्र, कारखाना बँकेच्या ताब्यात असताना मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या. चोरी गेलेल्या साहित्याची आणि मालमत्तेची जबाबदारी निश्चित करून त्याची रक्कम संबंधित बँकेकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुहास शिरसाठ यांनी केली.
मग बॉयलर का पेटवला?
यावर्षी गाळप झालं नाही तर बॉयलर का पेटवला? ट्रायल घ्यायचा होता तर तुम्ही तसं पत्रक काढलं का नाही काढले? ही सभासदांची फसवणूक आहे. आम्हालाही वाटतं कारखाना सुरू व्हावा, कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारखान्यातून चोरी गेलेल्या वस्तूची जबाबदारी एमएससी बँकेवर देऊन खटला चालवा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी केली.
कारखाना सुरू होण्यास वेळ लागेल..
देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कारखाना मोठा असल्यामुळे त्याची दुरुस्तीही मोठी होती. त्यामुळे कारखाना सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. जमीन विक्रीचे प्रकरण हे तात्कालीन व्यवसायकांनी केले होते. त्यामुळे त्याची देखील सभासदांच्या मागणीनुसार ठराव घेऊन एसआयटी चौकशी करू. आपल्या सर्वांच्या सहकार्याने लवकरच कारखाना सुरू होईल, असा विश्वास मुख्य प्रशासक कल्याण चव्हाण यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.