Beed NCP Sabha News  Sarkarnama
मराठवाडा

Beed NCP Sabha News : बीडच्या सभेत अजितदादा करणार मोठा धमाका; कार्यकर्त्यांबरोबर मुंबईत खलबतं

सरकारनामा ब्यूरो

Beed News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बीडमधील सभेनंतर येत्या रविवारी अजित पवारांच्या गटाची देखील सभा होणार आहे. अजितदादांच्या या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून या सभेचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी आता अजितदादांचा गट देखील मैदानात उतरणार आहे.

या सभेच्या पार्श्वभूमीवरच अजितदादांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघ आणि शहरांतील विकास कामासंदर्भातील निधीच्या मागणीचे प्रस्ताव घेऊनच मुंबईला बोलावून घेतले आहे. बीडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत कोणत्या विकास कामांना निधी मंजूर करता येईल, याचा आढावा देखील त्यांनी घेतला. त्यामुळे अजित पवार हे बीडच्या सभेत जिल्ह्यातील विकासकामांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाला पक्के आणि हो तर हो आणि नाही तर नाही, अशी ओळख असणारे नेते आहेत. आता बीडमध्ये होणाऱ्या त्यांच्या सभेचे 'प्रत्युत्तर सभा' नाव बदलून 'जिल्ह्याची अस्मिता आणि विकास' असे नाव दिल्याने या सभेत अजित पवार बीडमधील विकासकामांसाठी काय घोषणा करतात हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

अजितदादांनी घेतलेल्या बैठकीत कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची उपस्थिती होती.

धनंजय मुंडेंच्या रूपाने जिल्ह्याला कृषिमंत्रिपदही मिळाले. पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी 'एकला चलो'चा नारा देत पुन्हा एकदा पक्ष संघटनेसाठी राज्यभर दौरा सुरु केला. छगन भुजबळांच्या येवल्यानंतर त्यांनी आठवडाभरापूर्वी स्वाभिमान सभा घेतली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर अजित पवारांनी दहा दिवसातच बीडला सभेचे आयोजन केले.

शरद पवारांच्या स्वाभिमान सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवारांनी जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवत जिल्ह्यातील जनतेला आपलेसे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सभेची तयारी सुरु असतानाच दुसरीकडे अजितदादांनी जिल्ह्यातील नेत्यांना विकास कामांसाठी निधी प्रस्तावांसह मुंबईत बोलावून घेत कोणत्या कामांना मंजुरी देता येईल, याबात चर्चा केली. त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बीडसाठी काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT