DCM Devendra Fadanvis News
DCM Devendra Fadanvis News Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadanvis News : महाविकास आघाडीपेक्षा आमच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुधारली..

सरकारनामा ब्युरो

Budget Session : राज्यातील कायदा व सुव्यवस्था ही सांख्यिकीच्या आधारावर मोजण्यापेक्षा नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना किती आहे? त्यावर ठरवले पाहिजे. परंतु आकडेवारीच्या आधारावर ठरवायचेच झाले, तर महाविकास आघाडी सरकारपेक्षा आमच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारली आहे, हेच सहा महिन्यातील आकडे सांगतात, असा दावा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला.

विरोधक व सत्ताधारी दोन्ही बाजूंकडून मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला फडणवीसांनी एकत्रित उत्तर दिले. (Maharashtra Budget) विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर टीकेचा भडीमार केल्यामुळे फडणवीसांनी त्यावर सभागृहात भाष्य करतांना काही आकडेवारी समोर मांडली होती. (Mahavikas Agahdi) सुरूवातीलाच फडणवीस म्हणाले, सरकार बदलतात पण पोलिस तेच असतात. अनेकदा ते चांगल काम करतात, कधी चुकाही करतात, परंतु त्यांना आपण नेतृत्व कस देतो यावर बरचं अवलंबून असते.

पोलिस दलात वाझे सारख्या प्रवृत्तीचा प्रवेश झाला की काय होतं हे आपण पाहिलं. पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, गृहमंत्री तर गेले, पण पोलिस आयुक्त पण जेलमध्ये गेले. नेत्याविरुद्ध कट रचने, त्यांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार आम्ही समोर आणले. हे सरकार आल्यानंतर काही घटना जरूर घडल्या. पण कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न होणार नाही. कायदा व सुव्यवस्थेची चर्चा सांख्यिकीच्या आधारावर होता कामा नये. मुंबई महिलांसाठी अधिक सुरक्षित आहे, अर्ध्या रात्री लोकलमध्ये, रस्त्यावर ती एकटी फिरू शकते. देशातल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये महिला एकट्या फिरू शकतात का? याचा विचार केला पाहिजे.

क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर आहे, परंतु ही देखील चांगली गोष्ट नाही, अशी कबुली फडणवीसांनी दिली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी साडेतीन हजारांवर अधिक जणांवर तडीपारीच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय मोक्का अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या आहेत. अंमली पदार्थांच्या संदर्भात मोठ्या कारवाया केल्याचा दावा करतांनाच पुर्वीपेक्षा ५ ते ६ टक्के प्रमाणात अधिक गुन्हे उघडकीस आणण्यात आपल्याला यश आले आहे. अॅन्टी नार्कोटीक सेल प्रत्येक जिल्ह्यात तयार केला आहे. त्याचा अहवाल केंद्र आणि राज्याला पाठवावा लागतो.

शाळा, काॅलेजसजवळ कारवाया वाढवल्या असल्याचेही फडणवीसांनी उत्तरात सांगितले. कोयता गॅंग नाही, काही लोक कोयता घेवून दहशत निर्माण करतात. आता हे गुन्हे कमी झाले आहेत. महिलांविरुद्धचे गुन्हे २०२२ मध्ये ४४ हजार घडले होते. पैकी ९३ टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत, हे प्रमाण ९५ टक्यांवर नेण्याचाआमचा प्रयत्न आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रयत्न केले. ७० टक्के प्रकरणात आपल्याला यश आले. हे प्रमाण ८५ टक्क्यांवर या वर्षी न्यायचे उदिष्ट असल्याचे फडणवीस म्हणाले.

शक्ती कायद्या संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगतांनाच पोलिस विभागाने सुरू केलेले आॅपरेशन मुस्कान प्रचंड यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला. हरवलेल्या बालकांना शोधण्याचा हा उपक्रम होता, ११ वेगवेगळ्या आॅपरेशनमधून ३७ हजार बालकांना शोधून त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहचवण्यात आले आहे, यात मुलींचे प्रमाण मोठे होते. डायल ११२ चा प्रतिसाद वाढला असून काॅल आल्यानंतर साडेनऊ मिनिटात प्रतिसाद दिला जातो. हे प्रमाण आपल्याला ५ मिनिटापर्यंत खाली आणायचे आहे.

अमंली पदार्थ, अवैध वाळूच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. अपराध सिद्धतेचा दर ८ वरून ४८ टक्यांवर गेला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. आमदार पाटील यांनी ओबीसींच्या जातनिहाय गणनेचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर बिहारमधील जात गणनेचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. मनिषा कायंदे यांनी ब्राम्हण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करून आर्थिकदृष्ट्या कुमकूवत वर्गासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. यावर खुल्या प्रवर्गातून ब्राम्हण, कायस्थ, सीकेपी यांच्यासाठी `अमृत` सारखी संस्था सुरू केली असून त्याला निधी देखील दिला असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT