Mumbai News : बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडेंकडे दिल्याने कायदा सुव्यवस्था ढासळली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांनीच बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी केली होती.
तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बीडचं पालकमंत्रिपद स्वीकारावं,यामुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून तिथे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित होईल असं म्हटलं होतं. या सगळ्या घडामोडींनंतर आता बीडच्या पालकमंत्रिपदावरुन महायुती सरकार आणि विशेषत: भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत (Beed Guardian Minister) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करुन मोठा निर्णय घेणार असल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यात गेल्या काही महिन्यांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी राज्यभरात नकारात्मक चर्चेत आलेल्या बीडचं पालकमंत्रिपद भाजपच्या अनुभवी व वरिष्ठ नेत्याकडे दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेत विराजमान झाले आहे. पण या सरकारमधील नाराजीनाट्य काही केल्या संपत नसल्याचं दिसून येत आहे. आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत घमासान सुरू असल्याचे बोलले जात आहे.पण त्यात बीडच्या पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय तातडीने घेण्यात येणार आहे, अशी विश्वसनीय माहिती समोर येत आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी जोर धरत आहे. पण महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्याच्या तयारीत असल्याची मोठी माहिती समोर येत आहे.
खून,महिलांवरील अत्याचार,खंडणी,मारहाण,प्राणघातक हल्ले,यांसारख्या घटनांनी बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात धनंजय मुंडेंबाबत प्रचंड रोष जिल्ह्यात उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे. तर मराठा आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या मराठवाड्यातील बीडसारख्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार स्वीकारतील असं सध्यातरी शक्यता नाही.
पण बीड जिल्ह्यात सर्वच आघाड्यांवर शिस्त आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घ्यावे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. पण दुसरीकडे फडणवीसांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याची इच्छा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी एकनाथ खडसे मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी भाजपमधील अनुभवी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना परळी पॅटर्नचा उल्लेख करत प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण तापलं होतं.एवढंच नव्हे तर तिने पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेत धस यांची तक्रार दाखल केली होती.तरीही आमदार धस यांनी आपण माळीची माफी बिफी मागत नसतो अशी ठाम भूमिका घेतली होती.
पण काही वेळानंतर आमदार सुरेश धस यांनी माझ्या विधानामुळे कुणाचे मन दुखावले गेले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत माळींची माफी मागितली होती.यावेळी त्यांनी आपल्याला भाजप नेते चंंद्रकांत पाटील यांचा फोन आला होता.त्यांंच्यामुळेच आपण चुकलो नसलो तरी प्राजक्ता माळी यांची माफी मागत असल्याचं स्पष्ट केलं होतं.यावेळी त्यांंनी आपल्याला इतर कुठल्याही वरिष्ठ नेत्यानं माफीसाठी दबाव आणत फोन केला नसल्याचं ठामपणे सांगितलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.