
Nashik News: विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्ष पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागला आहे. पक्षाच्या नेत्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली. शहराच्या सर्व प्रभागांमध्ये आता बैठका घेतल्या जाणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असतानाही जागा वाटपानंतर नेत्यांमध्ये एकोपा नव्हता. विशेष करून काँग्रेसच्या निवडक इच्छुकांनी शिवसेनेला कोंडीत पकडले होते. उमेदवारांना अडचणीत आणले होते. यावर शिवसेनेच्या बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला फायदा झाला नाही. शिवसेनेने आता महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढावे, असा आग्रह धरला. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका देण्याची तयारी शिवसेनेने सुरू केल्याचे संकेत आहेत.
महापालिका निवडणुका येत्या दोन महिन्यात अपेक्षित असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे देखील उपस्थित होते. मध्यंतरी श्री बडगुजर वेगळ्या मार्गाने जाणार अशा चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी बैठकीला हजेरी लावून त्या चर्चांना पूर्णविराम दिला.
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने विस्कळीत झालेली संघटना पुन्हा एकदा मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घ्याव्यात कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार करावे आणि इच्छुक उमेदवारांशी संवाद साधावा, असे उपनेते सुनील बागुल यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शहरातील तीन मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाला संधी देण्यात आली होती. नाशिक पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिला होता. काँग्रेस पक्षाला शहरात एकही जागा मिळाली नाही.
नाशिक मध्य मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा दावा होता. मात्र शिवसेना ठाकरे पक्षाने हा मतदार संघ अक्षरश: खेचून घेतला. त्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज होता. या पक्षातील इच्छुकांनी विधानसभा निवडणूक प्रचारात सक्रिय भूमिका घेतली नाही, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी यावेळी केली. त्याचे पडसाद शिवसेनेच्या बैठकीत उमटले.
शिवसेना ठाकरे पक्षाने महापालिका निवडणुकीत स्वबळावर उमेदवारी दिली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चांगलेच कोंडी होऊ शकते. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाची ही बैठक चांगलीच चर्चेचा विषय झाली आहे.
यावेळी माजी महापौर वसंत गीते, माजी मंत्री बबनराव घोलप, संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, बाळासाहेब पाठक, संजय चव्हाण यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक आणि आगामी महापालिका निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.