Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde sarkarnama
मराठवाडा

Mahayuti Election Campaign: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी फडणवीस, शिंदेंच्या तोफा ठरल्या 'फुसका बार'; भाषणात टीकेचा चकार शब्दही नाही!

Chhatrapati Sambhajinagar Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पैठण आणि बीडमध्ये प्रचार सभा झाली. या दोन्ही ठिकाणी फडणवीस यांनी शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवर अवाक्षरही काढले नाही. उलट मित्रपक्ष आमचे शत्रू नाहीत, म्हणत चुचकारण्याचा प्रयत्न केला.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला छत्तीस तास उरले आहे. आज रात्री प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्या तरी राज्याच्या सत्तेत असलेले पण एकमेकांच्या विरोधात लढत असलेल्या शिवसेना-भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शेवटच्या दिवशी संयम बाळगल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही आज मराठवाड्यात होते. विशेष म्हणजे काही तासाच्या अंतराने दोघांची पैठणमध्ये जाहीर सभा झाली.

गेल्या काही दिवसापासून शिवसेना-भाजपचे राज्य पातळावरील नेते एकमेकांवर अक्षरशः तुटून पडल्याचे चित्र होते. कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्या भागात महायुतीतील दोन प्रमुख पक्ष असलेले शिवसेना-भाजपचे नेते एकमेकांचे वाभाडे काढत असल्याने तणावाचे वातावरण होते. परंतु यातून राज्यात चुकीचा संदेश जात असल्याचे लक्षात येताच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी का होईना शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी तोंडाला लगाम घातल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पैठण आणि बीडमध्ये प्रचार सभा झाली. या दोन्ही ठिकाणी फडणवीस यांनी शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांवर अवाक्षरही काढले नाही. उलट मित्रपक्ष आमचे शत्रू नाहीत, म्हणत चुचकारण्याचा प्रयत्न केला. मोदीजींचे व्हिजन थेट आपल्या शहरात प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक असले पाहिजे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेत असताना याचा उल्लेख आपल्या भाषणातून करताना ही योजना देवाभाऊ असेपर्यंत बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना फक्त लाडक्या ठेवू नका, त्यांना लखपती बनवा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभांमध्ये केले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने टाटा, बिर्ला, अंबानीला जसा एकाच मताचा अधिकार दिला आहे तसाच तो आपल्यालाही दिला आहे. संविधानाने महत्वाचा बदल काय केला तर राणीच्या पोटातून जन्माला येणाराच राजा, शासक ही राजेशाही मोडून काढली. आता मताच्या पेटीतून जो जन्माला येतो तो शासक ही लोकशाही आहे. खेड्याकडे चला हा संदेश जरी महत्वाचा असला तरी गेल्या 65 वर्षांमध्ये राज्यकर्त्यांनी लोक शहरात येतायेत याकडे लक्षच दिले नाही.

त्यासाठीचे नियोजन, सुख-सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गावांप्रमाणेच शहरांच्या विकासालाही प्राधान्य दिले. देशाच्या जीडीपीत शहरांचा 63 टक्के वाटा असून शहरांसाठी योजना तयार केल्या गेल्या. महाराष्ट्रालाही पन्नास हजार कोटी शहर विकासासाठी पंतप्रधानांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले. तुम्ही कमळाची काळजी करा, आम्ही पुढची पाच वर्ष तुमची काळजी करू,असे आश्वासन शेवटी त्यांनी दिले.

शिंदेंचा बाणही भात्यातच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर पैठणमध्ये लगेच एकनाथ शिंदे यांचीही सभा झाली. त्यांनीही आपल्या भाषणात भाजप व त्यांच्या नेत्यांवर टीका करणे टाळले. खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांना विकासकामांसाठी निधी दिल्याचा उल्लेख करत ते दिसतात साधे, पण कलाकार आहेत असा चिमटा काढला.

तत्पूर्वी चिखलठाणा विमानतळावर एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी जेव्हा युतीतीतील तणावांच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली का? याबाबत विचारणा केली. तेव्हा मी किंवा मुख्यमंत्री कुठे एकमेकांवर टीका करतोय का? असे म्हणत उत्तर देणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT