Maharashtra politics News: विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या पाच जागांच्या निकालावरून महायुतीतील शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तीनही मित्र पक्षांमध्ये संघर्षाची ठिणगी पेटली आहे. विशेषतः शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. युतीतील नेते थेट एकमेकांवर टीका करू लागल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात महायुतीच्या नेत्यांना मोलाचा सल्ला दिला. ऐतिहासिक संदर्भ देत 'एकत्र राहिलो तरच अधिराज्य गाजवू शकू', असे फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे 'प्रौढ प्रताप पुरंदर' या महानाट्याचा प्रयोग नागरिकांसाठी मोफत आयोजित केला होता. या प्रयोगाला फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी इतिहासाचे दाखले देत त्यांनी केलेल्या भाषणाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी संघर्ष केला. त्याचप्रमाणे आपणही एकत्रित राहिलो, तरच अधिराज्य करू शकतो. समाजातील विविध घटकांमध्ये एकजूट असेल, तर कोणतेही मोठे आव्हान पेलणे अशक्य नाही. अठरापगड जाती एकत्र आल्या, मावळे एकदिलाने लढले, त्यामुळेच स्वराज्याचा पाया भक्कम झाला. आपणही एकत्र राहिलो, तर अधिराज्य गाजवू शकतो. मात्र, आपापसांत विभागले गेलो तर गुलामगिरीकडे वाटचाल होईल, असा सूचक संदेश त्यांनी दिला.
आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि मुघलशाही यांचा उल्लेख करत फडणवीस यांनी इतिहासातील संघर्षाची आठवण करून दिली. देश आणि राज्याला नामोहरम करण्याचे प्रयत्न झाले. धर्म आणि संस्कृतीवर हल्ले झाले, महिलांवर अत्याचार झाले आणि समाज गुलामगिरीत गेला होता. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे ते म्हणाले.
सामाजिक एकजुटीच्या बळावरच त्यांनी शत्रूचा मुकाबला केला. आजही समाजात भेद निर्माण होऊ नयेत, तर सर्वांनी एकत्र राहून पुढे जाऊ तरच भगव्याचा विजय होईल. भेदभाव विरहित नव महाराष्ट्राच्या उभारणी करता शिवरायांचा साधुसंतांचा आशीर्वाद प्राप्त करूया, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संकटे आली तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून त्यांना प्रेरणा मिळेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून ६ कोटी ३३ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.