Vidhan Parisad : लव्ह जिहाद, बळजबरीने धर्मांतर करणे असे प्रकार राज्यात वाढत आहेत. या विरोधात हजारो, लाखोंचे सकल हिंदू समाचे मोर्चे देखील राज्यात निघाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारांच्या विरोधात असलेला जनतेच्या मनातील रोष पाहता लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात कडक कायदे करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सभागृहात सांगितले.
हा कायदा करतांना सध्या ज्या राज्यांमध्ये असे कायदे आहेत, त्यांचा देखील अभ्यास नवे कायदे तयार करण्यापुर्वी केला जाईल, असे देखील फडणवीसांनी स्पष्ट केले. (Maharashtra Budget) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या विषयावरील लक्षवेधी सभागृहात मांडली. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मनिषा कायंदे, प्रवीण दरेकर, भाई जगताप, उमा खापरे, प्रसाद लाड, अनिल परब या सदस्यांनी देखील भाग घेतला.
पडळकर म्हणाले, राज्यात हिंदू गर्जना मोर्चाच्या माध्यमातून लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या विरोधी कायद्याची मागणी केली जात आहे. माझ्या आटपाडी गावात एका दवाखान्यात रुग्णाला बरं करतो म्हणून एका व्यक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याला अटक करण्यात आली असता अनेक गावांत धर्मांतराचा सपाटा सुरू असल्याचे समोर आले. दौड तालुक्यात एका हिंदू वाल्मीकी समाजातील मुलाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला पण तो हाणून पाडला.
कुरेशी नावाच्या व्यक्तीने त्याची जबरदस्ती सुंता केली. पोलिसांनी सुरूवातीला तक्रार घेतली नाही, त्यानंतर आरोपी कुरेशीच्या पत्नीनेच तक्रार केली आणि त्याला अटक झाली. पण या प्रकरणात आरोपीला मदत करणारे त्याचे साथीदार अद्याप फरार आहेत. राज्यातील लव्ह जिहाद आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटना पाहता धर्मांतरबंदी कडक कायद्याची गरज आहे. धर्मातर करून सरकारचे लाभ घेण्याचे प्रकार देखील सुरू असल्याचे पडळकर म्हणाले.
लव्ह जिहादचे प्रकार वाढत असून श्रीमंत मुलींना फसवले जात आहे, नंतर त्यांच्या संपत्तीवर दावा सांगण्यात येत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. हिंदू मुलींचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र सुरू असतांनाच दुसरीकडे अंधश्रद्धेचा कायदा असतांना देखील खोटी अमिषे दाखवून धर्मांतराच्या घटना घडवल्या जातायेत. अशा लोकांवर कारवाई करून धर्मातर, लव्ह जिहादच्या विरोधात कडक कायदा आणणार का ? असा सवाल देखील पडळकर यांनी केला.
यावर फडणवीसांनी आपल्या उत्तरात सांगितले की, काही घटना या वस्तुस्थिती दर्शवणाऱ्या आहेत. अशा किती घटना घडल्या याची माहिती घेवून पटलावर ठेवली जाईल. फसवणूकीच्या हेतूने केलेले विवाह हा गैरच ठरतो. धर्मातर केलेल्या लोकांना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यावर बोलणे योग्य ठरेल. बळजबरीने धर्मातर करता येत नाही, असे कायदे आहेतच. त्याचा आढावा घेवून त्यात आवश्यक बदल करणे गरजेचे वाटल्यास तसे ते करता येतील.
हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज असून केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेशात यासाठी विशिष्ट कायदे आहेत. १४ ते १८ वयोगटातील मुलींना अमिष देवून फसवले जाते. प्रामुख्याने झोपडपट्टी भागात असे प्रकार घडतात याकडे लक्ष वेधत आमदार प्रसाद लाड यांनी धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी केली. मुलीचे वय १८ असेल तर पोलिसांवर दबाव आणला जातो. धर्मांतराची नोंद, आगाऊ नोटीस सरकारला दिली गेली पाहिजे.
ओला-ओबर, झोमॅटो, स्वीगी, ब्लड टेस्ट करायला येणाऱ्यांची नोंद नसते, अशा व्यक्तींकडून मुलींच्या बाबतीत गैर प्रकार घडल्याचे देखील असंख्य तक्रारी आहेत. पण त्यांची नोंद नसल्याचे कारवाई केली जात नाही याकडेही लाड यांनी लक्ष वेधले. याला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले, राज्यात ४० मोर्चे निघालेले आहेत. समाजात या संदर्भात तीव्र भावना आहे, ती शासनाने लक्षात घेतली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी केलेल्या कायद्यांची माहिती मागवली जाईल, आपल्याकडे कुठला कायदा असावा याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, नवा कायदा करणे सरकारच्या विचाराधीन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.